नांदूरमधमेश्वर अभयारण्यात मृत मासे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:28 PM2020-04-20T23:28:57+5:302020-04-20T23:29:14+5:30
जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असणाऱ्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील गोदावरी नदीमध्ये सोमवारी (दि.२०) करंजगाव ते मांजरगावदरम्यान असंख्य मृत मासे आढळल्याने अभयारण्यातील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. सदरच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी पक्षिमित्रांनी केली आहे.
लासलगाव/निफाड : जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असणाऱ्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील गोदावरी नदीमध्ये सोमवारी (दि.२०) करंजगाव ते मांजरगावदरम्यान असंख्य मृत मासे आढळल्याने अभयारण्यातील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. सदरच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी पक्षिमित्रांनी केली आहे.
सध्या गंगापूर धरणातून अहमदनगरसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी प्रवाहित झाली असून, नांदूरमधमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणावर काळेक्षार पाणी आणि पाणवेलीही वाहून आल्या आहेत. याच धरणस्थळावर अनेक गावांचाव तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असताना आलेल्या दूषित पाण्यामुळे गोदाकाठवरच्या करंजगाव, कोठुरे, मांजरगाव परिसरात सोमवारी सकाळी नागरिकांना शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. याच माशांवर नांदूरमधमेश्वर धरणातील माशांची गुजराण असल्यामुळे आता पक्ष्यांच्या अधिवासावरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी डॉ. उत्तमराव डेर्ले यांच्यासह पक्षिमित्रांनी केली आहे.
दरम्यान, निसर्ग मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तम डेर्ले यांनी सांगितले, हा परिसर रामसर परिसर म्हणून घोषित झाला आहे. परिसरात मोठ्या संख्येने देश-विदेशातील पक्ष्यांचा अधिवास आहे. परिणामी धरणाच्या पाण्यातील मत्यसंपदा या दूषित पाण्यामुळे धोक्यात आली आहे.
सदरची घटना लक्षात येताच नांदूरमध्यमेश्वर वन्य जीव विभागाचे कर्मचारी तातडीने गोदावरी नदी किनारी पाहणी करण्यासाठी गेले होते त्यांनाही मासे मृत झाल्याचे दिसून आले. दरम्यान मासे मृत झाल्यामुळे प्रदूषण विभागाकडे गोदावरी पात्रातील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी असल्याचे नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांनी सांगितले.