विशेष लेखी पूनर्परीक्षेसाठी १ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:33+5:302021-06-23T04:11:33+5:30
नाशिक : कोरोना संकटामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची हिवाळी २०२० लेखी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे घेण्यात ...
नाशिक : कोरोना संकटामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची हिवाळी २०२० लेखी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विशेष लेखी पूनर्परीक्षेसाठी परवानगी मिळावी यासाठी १ जुलैैैैपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी परवानगी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातील प्राचार्यांमार्फत लेखी अर्ज सादर करावा लागणार आहे.
विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० लेखी परीक्षा कोविड-१९ आजाराच्या वाढत्या संसर्गामुळे देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी संबधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांमार्फत विद्यापीठाकडे त्यांच्या लेखी परीक्षेच्या अनुपस्थितीविषयी दि.१ जुलैपर्यंत, विशेष लेखी पुनर्परीक्षेला बसण्याची परवानगी मिळण्यासाठी लेखी अर्ज सादर करण्याच्या सूचना विद्यापीठ परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी केल्या असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने लेखी परीक्षेस अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी २५ जून ते २५ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या विविध आरोग्य विज्ञान विद्याशाखांच्या हिवाळी २०२० प्रात्यक्षिक परीक्षेस प्रविष्ट व्हावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्याशाखानिहाय जाहीर करण्यात आलेले आहे. तसेच महाविद्यालयाहीला ई-मेलद्वारे पाठविण्यात आले असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
या विद्यार्थ्यांकरिता विशेष लेखी पुनर्परीक्षेचे वेळापत्रक यथावकाश विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याबाबत महाविद्यालयांनाही कळविण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र
ई-मेलद्वारे संबंधित महाविद्यालयांना पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.