आरटीई प्रवेशासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:47+5:302021-07-11T04:11:47+5:30
नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली ...
नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत सोडतीद्वारे निवड झालेल्या ४ हजार २०८ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यस्तरीय लॉटरी प्रक्रियेत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे २३ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
आरटीई अंतर्गत नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. ९) सायंकाळपर्यंत २ हजार ७२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, अजूनही १ हजार ४८१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळून त्यांनी प्रवेश घेतलेले नाही. या विद्यार्थ्यांच्या पालकांना वाढीव मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात आरटीई प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत २ हजार ७२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यापूर्वी पहिल्यांदा ३० जूनपर्यंतची प्रवेशाची मुदत संपल्यानंतर पहिल्यांदा ९ जुलैपर्यंत व त्यानंतर आता दुसऱ्यांदा २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत राज्यस्तरावरून सोडत जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याला विलंब झाला आहे. त्यामुळे निश्चित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू न शकणाऱ्या पालकांना मुदतवाढ मिळाली असून, वाढीव मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.