प्राणघातक हल्ला भोवला; चौघांना सात वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:53+5:302021-03-09T04:17:53+5:30
पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्यादी खंडू तान्हाजी बस्ते (२१, रा. फुलेनगर) हे १५ जानेवारी २०१४ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास तो ...
पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्यादी खंडू तान्हाजी बस्ते (२१, रा. फुलेनगर) हे १५ जानेवारी २०१४ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास तो त्याच्या नातलगांसोबत आरोपी दीपक शेळके याच्या घरी जाऊन ‘माझ्या नातेवाइकास मोबाइल चोरी करण्यासाठी सोबत घेऊन जाऊ नको’ अशी विनवणी केली. त्याचा राग मनात धरत दीपक याने त्याचा भाऊ संतोष कारभारी शेळके, आई पारुबाई कारभारी शेळके व विक्की ऊर्फ विलास सुरेश खिच्ची (सर्व रा. अवधूतवाडी, फुलेनगर) यांच्यासह फिर्यादी बस्ते यांच्या नातेवाइकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. तसेच पारुबाई हिने खंडू यांचे मेव्हणे हरीष यांना धरून ठेवले, तर विक्कीने त्याच्याकडील चाकूने त्यांच्यावर सपासप वार करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पी. ए. पवार यांनी तपास करून न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुलभा सांगळे यांनी युक्तिवाद केला. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने चौघा आरोपींना शिक्षा सुनावली.