डझनभर गावगुंडांचा पोलीस गस्त पथकावर प्राणघातक हल्ला; एक पोलीस गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 05:43 PM2019-06-10T17:43:31+5:302019-06-10T18:04:22+5:30
नाशिक : शहरामध्ये गावगुंडांचा धुडगुस सुरूच असून नवीन सीबीएस बसस्थानकाच्या आवारात रविवारी (दि.९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास डझनभर गावगुंडांच्या ...
नाशिक : शहरामध्ये गावगुंडांचा धुडगुस सुरूच असून नवीन सीबीएस बसस्थानकाच्या आवारात रविवारी (दि.९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास डझनभर गावगुंडांच्या टोळक्याने अंडाभुर्जी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला दमबाजी करत त्याच्या वाहनाची तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांच्या पथकावरही टोळक्याने लाकडी दंडुके, लोखंडी फावड्यांनी हल्ला चढविला. पोलिसांना दमबाजी करून त्यांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयित हल्लेखोरांना अटकाव करत असताना एका हल्लेखोराने पोलीस कॉन्स्टेबल सागर हजारी (रा.मुख्यालय वसाहत) याच्या डोक्यात लाकडी दंडुका व लोखंडी फावड्याने प्रहार केला. यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन अंतर्गत रक्तस्त्रावदेखील झाला आहे. हजारी यांच्यावर खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मेंदूच्या नाजूक भाग सुदैवाने शाबुत राहिल्याने रूग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नाशिक शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून वाढती गुन्हेगारीने नागरिक त्रस्त झाले आहे. पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गावगुंडांची मजल वाढल्याने संताप व्यक्त होत आहे. हजारी हे उपनिरिक्षक योगीता नारखेडे यांच्या पथकासह घटनास्थळी पोहचले होते. तरीदेखील टोळक्याने पोलिसांवर चाल केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला, दंगल माजविणे, शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन करणे आदि गुन्हे संंशयितांवर दाखल करण्यात आले आहे. सर्व संशयितांना पोलिसांनी रात्रीतून अटक केली आहे. यामध्ये काही अल्वयीन असून काही सराईत गुन्हेगार आहेत. सर्व गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टी भागातील आहे.