घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 07:40 PM2019-03-30T19:40:26+5:302019-03-30T19:41:57+5:30
पाटोदा (गोरख घुसळे) अल्पशा पावसामुळे यावर्षी भूजलपातळी मोठया प्रमाणात खालावल्यामुळे येवले तालुक्यातील गुजरखेडे गावातील सर्वच विहिरी तसेच बोअरवेल्स कोरडेठाक पडल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
पाटोदा (गोरख घुसळे) अल्पशा पावसामुळे यावर्षी भूजलपातळी मोठया प्रमाणात खालावल्यामुळे येवले तालुक्यातील गुजरखेडे गावातील सर्वच विहिरी तसेच बोअरवेल्स कोरडेठाक पडल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
येथील नागरिकांना पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. तेव्हा कुठे हंडे दोन हंडे पाणी उपलब्ध होत आहे. गावात टँकर आल्यावर पाणी भरण्यासाठी महिला पुरु ष व मुलांची मोठया प्रमाणात झुंबड उडत आहे. त्यातूनच पाणी भरण्यावरून गावात भांडण तंटे होत आहे.
गेल्या वर्षभरापासून पावसाळ्यातही या गावाला शासनाच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांची संपूर्ण मदार ही शासनाने सुरु केलेल्या टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या गावातील पाण्याचा टँकर हा अनियमित येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करून घोटभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करीत पाणी उपलब्ध करून आपली तहान भागवावी लागत आहे.
याबाबत येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे आपली कैफियत मांडली व गावाला नियमित पाणी पुरवावे अशी मागणी केली असता, गावात दोन दिवसांपासून टँकर सुरु करण्यात आला, मात्र सुमारे दीड हजार लोकसंख्येच्या या गावाला दिवसाकाठी एकच पाण्याची खेप केली जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना रोजच टँकरची वाट पहावी लागत आहे.
प्रत्येक दिवशी एका वस्तीवर एक खेप टाकली जात असल्याने दुसऱ्या वस्तीवर अथवा गावात पाच ते सहा दिवसांनी दुसरी खेप मिळत असल्याने नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागत आहे. याच पाण्याचा पाच ते सहा दिवस जपून वापर करावा लागत आहे. या गावासाठी शासनाने टँकरच्या खेपा वाढवून द्याव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून या गावाला दरवर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी दरवर्षी लाखो रु पयांचा खर्च येत आहे. मात्र पाणी टंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी या गावासाठी कोणतीही योजना राबविली जात नसल्याने ग्रामस्थांना दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येवला पंचायत समिती प्रशासनाने या गावासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवावी तसेच गावात पिण्याच्या पाण्याच्या खेपा वाढविण्यात याव्यात अशी मागणी नारायण चव्हाण, अनिल चव्हाण, बाळू आढांगळे, विष्णू चव्हाण, पुंजाराम गुजर, पोपट चव्हाण, पांडुरंग चव्हाण, बाळू चव्हाण, अशोक चव्हाण, रामदास पवार, रमेश चव्हाण, रावसाहेब पारखे, चंद्रभान चव्हाण, मधुकर पवार, ज्ञानेश्वर पवार आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.
गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येवला पंचायत समिती मार्फत सध्या एका टँकरने गावला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणी पुरवठा अनियमित केला जात असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावासाठी टँकरच्या किमान दोन खेपा पुरविण्यात याव्या त्यामुळे पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल.
- धर्मा पारखे, गुजरखेडे.
या गावाला गेल्या काही वर्षांपासून टँकरने पाणी पुरवले जात आहे. गावासाठी कायमस्वरूपी योजना राबवावी व पाणी प्रश्न कायमचा सोडवावा. ग्रामस्थांबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शासनाने या गावात टँकरच्या फेऱ्या वाढवून देण्यात याव्या.
- कर्णा चव्हाण, गुजरखेडे.