जीवघेणा प्रवास : नांदूरशिंगोटे महामार्गावरील दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 08:26 PM2020-09-29T20:26:08+5:302020-09-30T01:04:02+5:30
नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. गावाला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. संबंधीत विभागाने रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. गावाला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. संबंधीत विभागाने रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
नाशिक - पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पुर्वी नांदूरशिंगोटे गावातून जात होता. परंतु गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने बाह्यवळण रस्ता गावाच्या बाहेरून गेला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली असली तरी परिसराला जोडणाऱ्या रस्ते मोठ्या प्रमाणात आहे. नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या महामार्गावरील निमोण नाका, सिन्नर व संगमनेर कडे जाणाऱ्या मुख्य रस्ता, चास नाका, निमोण रोड आदी ठिकाणी सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. दीड ते दोन फूटापर्यंत खड्डे असल्याने वाहन चालविताना कसरत करावी लागते. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर गावातील नागरिकांना दळणवळणासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड ठेवण्यात आले आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अवजड वाहनांना नुकसान सोसावे लागत आहे. अनेकदा रात्रीच्या वेळेस रस्त्यावरील खड्डे लक्षात न आल्याने दुचाकीवरुन घसरण्याचे प्रकार घडले आहेत. नांदूरशिंगोटे ते निमोण रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने या भागातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. निमोण रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या शाळा, महाविद्यालय, मंदिरे, पर्यटन स्थळे बंद असल्याने विद्यार्थी व भाविकांची ये - जा बंद आहे. सुरळीत झाल्यानंतर त्यांनाही रस्त्यावरील खड्यखतून वाट शोधताना कसरत करावी लागले. संबंधीत विभाग व रस्ते विकासक कंपनीने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
वाहन चालकांची कसरत
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असून दररोज पंधरा ते वीस गावांचा खरेदी विक्रीसाठी संपर्क येतो. तसेच संगमनेर, अकोला, लोणी, कोपरगाव, श्रीरामपूर, पुणे आदी भागात जाण्यासाठी येथून पर्यायी व्यवस्था असल्याने नेहमीच दळणवळण असते. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सुरु असलेल्या पावसाने या भागातील रस्त्यांंची वाट लागली आहे. रस्त्यात खड्डा कि खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावरील खड्यांमध्ये वाढ झाली आहे. खड्यांची डागडुजी होणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
-रामदास सानप, ग्रामस्थ
फोटो ओळी :
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवरील जीवघेणा खड्डा. तर दुसऱ्या छायाचित्रात नांदूरशिंगोटे गावातून संगमनेर जाणाऱ्या रस्तावर निमोणनाका येथील खड्डेच खडे.