एका बीट मार्शलचा मृत्यू : शासकिय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:59 PM2019-04-04T14:59:24+5:302019-04-04T15:00:36+5:30
दोघा बीट मार्शल’ पोलिसांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेत गंभीरपणे जखमी झालेल्या दोघा पोलिसांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, गुरूवारी (दि.४) पोलीस शिपाई नंदू जाधव (४०, रा.पंचवटी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
नाशिक : द्राक्षाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू भरधाव जीपने रात्रीच्या सुमारास पेठरोडवरील चौफूलीवर रात्रीच्या गस्तीवर असलेल्या दोघा बीट मार्शल’ पोलिसांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेत गंभीरपणे जखमी झालेल्या दोघा पोलिसांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, गुरूवारी (दि.४) पोलीस शिपाई नंदू जाधव (४०, रा.पंचवटी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या जवनांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. जाधव यांच्या कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दु:खात सर्व पोलीस दल सहभागी असून कुटुंबाला आर्थिक मदतीचा आधार मिळवून देण्याचा निश्चितच प्रयत्न राहणार असल्याचे आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी शोकभावना व्यक्त करताना सांगितले.
गेल्या सोमवारी (दि.१) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पेठरोडवरील म्हसरूळ पोलीस ठाणे अंकीत पोलीस चौकीजवळ जीपने (एम.एच १७ बीवाय ९०७०) एका मिनी टेम्पोला धडक दिल्यानंतर स्त्याच्या बाजूला दुचाकीजवळ उभ्या असलेल्या दोघा बीट-मार्शल कर्मचाऱ्यांनाही धडक दली. धडक इतकी भीषण होती की जाधव व राजेश लोखंडे हे दुरवर फेकले गेले. दरम्यान, जीप उलटली व जाधव त्याखाली सापडले गेले. दोघा पोलिसांना गंभीर जखमी अवस्थेत रात्री तत्काळ उपचारासाठी मुंबईनाका भागातील एका खासगी रूग्णालयात उपचारार्थ पोलिसांनी दाखल क रण्यात आले होते. जाधव यांच्यावर उपचार सुरू असताना गुरूवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. तर लोखंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात मयत झालेल्या जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जाधव हे मागील २१ वर्षांपासून पोलीस सेवेत कार्यरत होते. पंचवटी, म्हसरूळ, पोलीस आयुक्तालयासह त्यांनी अन्य ठिकाणी सेवा बजावली. पोलीस शिपाई म्हणून भरती जाधव भरती झाले होते, ते सध्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर नोकरी करत होते. दुपारी शोकाकुल वातावरणात जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, माधुरी कांगने, पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्यासह म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील रोहकले, गुन्हे शाखा युनिट-१चे आनंदा वाघ, बलराम पालकर, मंगलसिंह सुयर्वंशी, सुरज बिजली यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.