गोदावरीत बुडून दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 01:24 AM2019-05-21T01:24:25+5:302019-05-21T01:24:55+5:30
तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.
निफाड/ पिंपळस : तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी सदर घटना घडली़ सोमवारी पाच तासांच्या अंतराने दोघांचे मृतदेह तपास यंत्रणेच्या हाती लागले. आतेभाऊ व मामेभावाचा एकाचवेळी बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील श्रीरामनगर येथील हर्षद ठकाजी गुंजाळ (१५) हा आतेभाऊ श्याम बाळासाहेब सुरवाडे (२४) याच्याकडे पिंपळस रामाचे येथे आतेबहिणीच्या लग्नासाठी आलेला होता. रविवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान हे दोघे पिंपळस येथील स्मशानभूमीच्या मागे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. सायंकाळी उशीर झाला तरी ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. शोध सुरु असताना गोदावरी किनारी दोघांचे कपडे आढळून आले. रात्रीउशीरापर्यंत त्यांचा नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाने दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण रविवारी उशिरापर्यंत ते मिळून न आल्यामुळे रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हर्षद गुंजाळ याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. निफाड उपजिल्हा रुग्णालयात गुंजाळ याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. दुपारी श्रीरामनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत हर्षद हा ठकाजी गुंजाळ यांचा एकुलता मुलगा होता. दरम्यान सोमवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान श्याम सुरवाडे याचा मृतदेह शोधण्यात यश आले. निफाड रुग्णालयात सुरवाडे याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बहिणीच्या लग्नाआधी मृत्यू
श्याम हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. मोठ्या बहिणीचा विवाह झालेला आहे, तर लहान बहिणीचे मंगळवारी (दि. २१) लग्न होणार होते. घरात पाहुण्यांची वर्दळ होती. सर्वत्र लग्नाच्या तयारीची लगबग सुरु होती. दुर्दैवाने हळदीच्या दिवशीच भावाचा मृतदेह पाहण्याची वेळ बहिणीवर आली.