मृत्यूमुखी : खाली पडलेला चेंडू बघताना चिमुकला बाल्कनीतून कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 04:41 PM2020-07-30T16:41:23+5:302020-07-30T16:42:01+5:30
आईने घाईघाईने प्लॅस्टिकचा लहान चेंडू उचलला अन् पुन्हा वर येत असताना काही तरी पडल्याचा मोठा आवाज झाला म्हणून मागे वळून बघितले असता गौरव कोसळल्याची बाब त्यांच्या लक्षात आली
नाशिक : घराच्या बाल्कनीतून चेंडू बाहेर गेल्याने रेलिंगवर चढून डोकावताना पावणेतीनवर्षीय चिमुकल्याचा तोल जाऊन खाली कोसळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शिवाजीनगर भागात घडली. या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजीनगरमधील रूद्र अव्हेन्यू या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेत शरद शेवाळे हे आपली पत्नी व एकुलता एक मुलगा गौरवसोबत राहत होते. गौरव आणि त्याची आई बुधवारी (दि.२९) संध्याकाळी घरात एकटे होते. आई स्वयंपाकघरात काम करत असताना गौरवचा प्लॅस्टिकचा चेंडूने बैठकखोलीत खेळत होता. यावेळी त्याचा चेंडू बाल्कनीत खाली पडला. यावेळी गौरवने ही बाब आईला सांगितली. आईने हातातील काम सोडून ‘तू घरातच थांब मी बॉल घेऊन लगेच आले...’ असे गौरवला बजावले आणि तत्काळ खाली उतरून गेल्या. त्यांच्या पश्चात गौरवदेखील बाल्कनीत त्यांना बघण्यासाठी आला आणि बाल्कनीच्या रेलिंगच्या अर्धा ते एक फूटाच्या भिंतीवर पाईपच्या अधारे उभा राहून खाली डोकावून आईला बघू लागला; तोपर्यंत त्याच्या आईने घाईघाईने प्लॅस्टिकचा लहान चेंडू उचलला अन् पुन्हा वर येत असताना काही तरी पडल्याचा मोठा आवाज झाला म्हणून मागे वळून बघितले असता गौरव कोसळल्याची बाब त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला. गोंधळ अन् गोंगाटाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत तत्काळ गौरवला उचलून जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र गौरवच्या छातीला जबर मार लागल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यूमुखी पडल्याचे वैद्यकिय अधिका-यांनी घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार प्रदीप भूमकर हे पुढील तपास करीत आहेत.