कोरोनाबाधित पोलिसाचा मृत्यू; पोलीस दलावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 06:34 PM2020-05-09T18:34:14+5:302020-05-09T18:43:16+5:30
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त पोलिसांची कुमक याठिकाणी कर्तव्य बजावत आहे.
नाशिक : शहरातील पंचवटी विभागातील कोणार्कनगर भागात राहणाऱ्या एका करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्षात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.9) पहाटे घडली. त्यांचा कोरोना चाचणी नमुना अहवाल पॉसिटीव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत नाशिक शहरात करोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील मृतांचा आकडा आता २०वर पोहोचला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्कनगर येथील एका ५१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यास मालेगाव येथे ड्युटी केल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना सौम्य लक्षणे आढळून आल्यामुळे करोना संशयित म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयातील कक्षात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ.चेवले यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. ते उपचाराला प्रतिसाददेखील देत होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांना व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले. अखेर उपचारास त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हे ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारी होत. यानंतर दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी जाहीर केले. आले. ---
९० पेक्षा अधिक पोलीस कोरोनाग्रस्त
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त पोलिसांची कुमक याठिकाणी कर्तव्य बजावत आहे. जवळपास आतापर्यंत मालेगाव शहरात कर्तव्य बजावणाऱ्या ९० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.