पोलीस भरतीदरम्यान दिंडोरीच्या युवकाचा मृत्यू
By admin | Published: June 14, 2014 12:10 AM2014-06-14T00:10:41+5:302014-06-14T01:18:30+5:30
दिंडोरी : मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील विशाल केदार या युवकाचा भरतीच्या धावण्याच्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात दुर्दैवी अंत झाला.
दिंडोरी (जि. नाशिक) : मोलमजुरी करून पदवीचे शिक्षण घेऊन माता-पित्यांंचा आधार बनण्यासाठी मुंबई येथे पोलीस भरतीसाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील विशाल केदार (२४) या युवकाचा भरतीच्या धावण्याच्या चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात दुर्दैवी अंत झाला.
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील विशाल सुरेश केदार, गणेश सदाशिव दरगोडे, लक्ष्मण अंबादास गवळी हे तीन युवक मुंबई विक्रोळी (पूर्व) येथे गेले होते. मंगळवारी त्यांच्या विविध चाचण्या झाल्या. त्यात हे तिघेही पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले. बुधवारी सकाळी ७ वाजता हजर होते मात्र त्यांना दुपारी बारा वाजता त्यांची चाचणी सुरु झाली. शेवटचा टप्पा दृष्टीक्षेपात असतानाच विशालला चक्कर आली. गणेशने त्याला सावरत आधार देत झाडाचे सावलीला बसविले. त्याचवेळी मागून धावत येत असलेल्या त्याचा दुसरा मित्र लक्ष्मण याने विशालला अत्यवस्थ पडलेला पाहून त्याच्याकडे धाव घेतली. त्यानंतर विशालला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी विशालचे प्राणोत्क्रमण झाले.
दरम्यान, इंदोरे ग्रामस्थ व विशालच्या नातेवाईकांनी दिंडोरी येथे प्रांत मुकेश भोगे व तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिले आहे. विशालचा मृत्यू पोलीस भरती प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला असून केदार परिवारास शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे या गावातील विशाल हा सुरेश केदार यांचा एकुलता एक मुलगा. अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे मोलमजुरी करीत विशालने आपले एम.कॉम.चे शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाच्या चरितार्थासाठी विशालला नोकरीची नितांत आवश्यकता होती. म्हणून विशाल तात्पुरत्या मानधनावर इंदोरे ग्रामपंचायतमध्ये लिपिक म्हणून काम करीत असे. आपल्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती असल्याने आपण नोकरीचा शोध घेतल्याशिवाय पर्याय नाही. याहेतूने विशाल दोन दिवसापूर्वी मुबई येथे पोलीस भरतीसाठी गेला होता. त्याप्रसंगी त्याचा अंत झाला. घरातला कर्ता युवक अचानक गेल्याने केदार कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
अधिवेशात औचित्याचा मुद्दा
विशाल केदारच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून या कुटुंबीयांस पाच लाख रु पयाची मदत करावी, अशी मागणी आमदार धनराज महाले यांच्याकडे करण्यात आली. अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून महाले यांनी केदार कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सखोल चौकशी करून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)