केला ग्रुपच्या तीनही कंपन्यांतील कामगारांचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:19 AM2021-09-17T04:19:16+5:302021-09-17T04:19:16+5:30

केला ग्रुपच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ओम फेब्टेक प्रा. लि., सुपर टेक्नोफेब प्रा. लि., सत्यसाई प्रेशर वाल्स प्रा. लि. ...

Death fast of workers of all the three companies of Kela Group | केला ग्रुपच्या तीनही कंपन्यांतील कामगारांचे आमरण उपोषण

केला ग्रुपच्या तीनही कंपन्यांतील कामगारांचे आमरण उपोषण

Next

केला ग्रुपच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या ओम फेब्टेक प्रा. लि., सुपर टेक्नोफेब प्रा. लि., सत्यसाई प्रेशर वाल्स प्रा. लि. या कंपनींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांवर कंपनी व्यवस्थापनाकडून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारावी यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्या कामगारांना परराज्यात बदली केली जात आहे. तसेच कंपनीतील कामगारांची एकजूट होऊ नये, संघटना स्थापन करू नये यासाठी बाहेरील गुंडांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप कामगारांनी उपोषणाच्या वेळी केला आहे.

कंपनीतील कायमस्वरूपी कामगारांच्या बदल्या थांबवून त्यांना आहे त्याच कंपनीत कामावर रुजू करून घ्यावे, यापुढे कोणत्याही स्थानिक कामगाराची बदली करू नये, कामगारांना त्यांच्या कष्टाच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा, कंपनीचे स्थलांतर करू नये, कामगारांची दोन वर्षांपासूनची बाकी असलेली फरकाची रक्कम कामगारांना अदा करावी, कामगारांसाठी कंपनीत कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही त्याची पूर्तता करावी, नोटबंदीच्या काळात कामगारांना बळजबरी ५० हजार रुपये बोनस देऊन नंतर तो कामगारांकडून वसूल केला असल्याचा आरोपही कामगारांनी केला असून, त्याची चौकशी करण्यासह विविध मागण्यांसाठी कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

यासंदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून, निवेदनाच्या प्रती कामगार मंत्री, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस मुख्य अधीक्षक, नाशिक ग्रामीण, पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक एमआयडीसी व सिन्नर यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर शिवछावा संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष संगीता मुरकुटे यांची स्वाक्षरी आहे.

चौकट...

आजपर्यंत कंपनीतून कोणत्याही कामगाराला कामावरून काढले नाही. कोरोना महामारी येण्यापूर्वी कंपनीकडे ५० टक्के ऑर्डर्स होत्या, त्या आता १० टक्क्यांवर आल्या आहेत. मध्यंतरी सिलिंडर लिकेज आढळल्यानंतर तीनही कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. चार-साडेचार महिन्यांत सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. सध्या ऑर्डर्स एकदम कमी आहेत. त्यामुळे कामगारांना काम नाही. कामगार संख्या अतिरिक्त आहे. त्यामुळे कामगारांना कमी करण्याऐवजी त्यांची बदली केली. तथापि, काही संघटना व त्यांचे पदाधिकारी माझ्यासह अधिकाऱ्यांवर दबाब आणून मानसिक त्रास देत आहेत. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. असाच गैरप्रकार सुरू राहिल्यास कंपन्या बंद करणे किंवा स्थलांतरित करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- किशोर केला, संचालक, केला ग्रुप.

फोटो ओळी- सिन्नर येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषणास बसलेल्या शिवछावा संघटनेचे पदाधिकारी व कामगार.

Web Title: Death fast of workers of all the three companies of Kela Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.