लसीकरणानंतर महिला डॉक्टरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 01:28 AM2021-10-21T01:28:32+5:302021-10-21T01:30:13+5:30
इगतपुरीतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अध्यापन करणाऱ्या डॉ. स्नेहल लुणावत या ३२ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुर्मीळ गुंतागुंत होऊन त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ तयार झाली होती. त्यातून उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘एईएफआय’ समितीने स्पष्ट केले आहे.
नाशिक : इगतपुरीतील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अध्यापन करणाऱ्या डॉ. स्नेहल लुणावत या ३२ वर्षीय महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर दुर्मीळ गुंतागुंत होऊन त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ तयार झाली होती. त्यातून उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘एईएफआय’ समितीने स्पष्ट केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी येथे दंतचिकित्सा विषय शिकविणाऱ्या डॉ. स्नेहल लुणावत यांनी २८ जानेवारीस कोरोना योद्धा म्हणून कोरोना प्रतिबंधक लस घेतली हेाती. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर स्थानिक डॉक्टरांनी माईल्ड माइग्रेन असल्याचे निदान करून औषधेही दिली हेाती. दरम्यान, त्या दिल्ली येथे एका कार्यक्रमासाठी गेल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. विशेषत: मेंदूत रक्ताची गाठ झाल्यानंतर नोएडा येथील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पंधरा दिवस तेथे उपचार केल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले हेाते. तेथे सात दिवसांनंतर म्हणजे १ मार्चला त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या कुटुंबीयांनी आधी लस उत्पादित करणाऱ्या कंपनीला कळविले आणि त्यानंतर शासनाकडेही तक्रार केली होती. लसीकरणााच्या दुष्परिणामांमुळेच डॉ. स्नेहल यांचा मृत्यू झाला, अशी तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली हेाती. या संदर्भात केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी नियुक्त केलेल्या ‘एईएफआय’ समितीने नुकताच अहवाल दिला असून, त्यात ‘सिरिअस ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन’ असे नमूद केले आहे. एक प्रकारे लसीकरणामुळे अशी घटना घडल्याची नोंद असली तरी हा निष्कर्ष उपलब्ध माहितीवरून काढण्यात आला आहे. अधिक माहिती मिळाल्यास त्यात बदल होऊ शकतो, असेही अहवालाच्या तळटिपेत नमूद करण्यात आले आहे.
-----------------
लसीकरणावेळी दक्षता घ्या
लुणावत कुटुंब मूळचे इगतपुरी येथील असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून ते औरंगाबाद येथे स्थायिक आहेत. डॉ. स्नेहल यांचे वडील दिलीप लुणावत हे एका कंपनीत उपाध्यक्षपदावर असून, त्यांना या मृत्यूने मोठा धक्का बसला आहे. सध्या १८ ते ४५ वयोगटासाठीही शासन लसीकरणावर भर देत आहेत. मात्र, या पिढीने काळजी घेण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
-------------
लसीकरणातून अशी दुर्मीळातील दुर्मीळ आणि दुर्दैवी घटना घडू शकते. मात्र, त्यामुळे घाबरून जाऊ नये. लाखो लोक लसी घेऊन सुरक्षित झाले आहेत. सध्या कोरोना लसीकरण हेच एक प्रतिबंधासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लसीकरण करावे त्यानंतर काही त्रास झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, नाशिक महापालिका