जवान कुलदीप जाधव यांचा मृत्यू : नवजात बाळाला बघण्याचे बापाचे स्वप्न नियतीने हिरावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 02:13 PM2020-11-22T14:13:16+5:302020-11-22T14:15:50+5:30
रविवारी जिल्हा सैनिक अधिकारी औंकार कपाले यांनी जाधव यांच्या मृत्युच्या बातमीला दुजोरा देत त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.२३) रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार असल्याचे कपाले यांनी सांगितले.
नाशिक : जम्मु-काश्मिरमध्ये या हंगामात बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली असून रक्त गोठविणाऱ्या थंडीच्या कडाक्याने भारतीय सेनेतील वीर जवान व नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र कुलदीप नंदकिशोर जाधव(२५,रा.पिंगळवाडे) यांचा बळी घेतला आहे. कर्तव्यावर असताना राजौरी सेक्टरमध्ये त्यांचा थंडीने गारठून मृत्यू झाला आणि आपल्या आठवडाभराच्या बाळाला बघण्याचे जाधव यांचे स्वप्न नियतीने पुर्ण होऊ दिले नाही. त्यांच्या निधनाच्या बातमीला जिल्हा सैनिक अधिकारी कार्यालयाकडून रविवारी (दि.२२) दुजारो मिळाला.
जम्मू-काश्मीर मध्ये भारताच्या सीमेवर तैनात असलेले जाधव यांचा कडाक्याच्या थंडीत झोपेतच मृत्यू झाला. आठ दिवसांपूर्वीच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याने ते रविवारपासून सुट्टी घेऊन आपल्या पिंगळवाडे या मुळ गावी घरी परतणार होते; याबाबत त्यांचे काही दिवसांपुर्वीच कुटुंबियांशी फोनवरुन बोलणेही झाले होते; मात्र नियतीला काही वेगळेच मान्य असल्याने आपल्या लहानग्याला बघण्याचे जाधव यांची इच्छा पुर्ण होऊ शकली नाही. त्यांच्या निधनाची वार्ता सोशलमिडियावर शनिवारी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत व्हायरल होत होती; मात्र स्थानिक जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून याबाबत अधिकृतपणे शनिवारी मध्यरात्रीपर्यंत कुठल्याहीप्रकारे दुजोरा दिला गेला नाही. यामुळे संभ्रामवस्था निर्माण झाली होती.
रविवारी जिल्हा सैनिक अधिकारी औंकार कपाले यांनी जाधव यांच्या मृत्युच्या बातमीला दुजोरा देत त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.२३) रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईत दाखल होणार असल्याचे कपाले यांनी सांगितले. जाधव यांच्या पश्चात आठ दिवसांचा मुलगा, पत्नी, आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
चार वर्षांपुर्वी भारतीय सैन्यात भरती
जाधव हे चार वर्षांपासून सैन्यात भरती झाले होते. जम्मू काश्मीरच्या लेह भागात ५०८ अे.सी बटालियनमध्ये कर्तव्यावर तैनात होते. प्रवासादरम्यान ते कॅम्पमध्ये रात्री मुक्कामी थांबले असता सकाळी ते झोपेतून पुन्हा उठू शकले नाही यावेळी त्यांना तपासले असता ते मयत आढळून आले, अशी माहिती सैन्यदलाकडून सटाणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गायकवाड यांना देण्यात आली. त्यांचे पार्थीव मंगळवारी सकाळपर्यंत सटाण्यात दाखल होण्याची शक्यता असल्याचे गायकवाड यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.