अज्ञात वाहनाच्या धडकेने वानराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 11:40 PM2020-04-10T23:40:56+5:302020-04-10T23:43:13+5:30
पाथरे : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळील महानुभव आश्रमासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने एका वानराचा मृत्यू झाला. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी पाथरे गावात सहा वानरांचा समूह आला होता. गावात दोन दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर ही वानरे महामार्गाच्या पलीकडे एकत्रित जात असताना अज्ञात वाहनाची धडक लागून त्यातील एक वानर जागीच ठार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क

आपला सवंगडी रस्त्यावर पडलेला पाहून बाकीची पाच वानरे त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होते. हे दृश्य रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी बघितले आणि घटनेची खबर गावात पोहोचली. गावातील मोजक्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दी होऊ नये म्हणून काही कार्यकर्त्यांनी गर्दीला रोखले. या घटनेची बातमी वनक्षेत्रपाल पी. बी. सोनवणे, वनपाल सरोदे, इरकर व पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी नारायण वैद्य यांनी पंचनामा केला. वावीचे पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश पवार यांनी शवविच्छेदन केले. वानराचा मृतदेह गावातील हनुमान मंदिरात आणण्यात आला. मंदिराजवळील मोकळ्या जागेत वानराचा दफनविधी करण्यात आला. यावेळी बाकीचे शोकाकुल वानरे मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर बसून होते. मुक्याप्राण्यांच्या संवेदनेने ग्रामस्थही गहिवरून गेले. या घटनेची खबर गावात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. हनुमान जयंतीच्या दिवशी प्रत्यक्ष हनुमंतरायाने गावाला दर्शन दिले अशी ग्रामस्थांची, प्राणीमित्रांची भावना झाली.मंदिर उभारणार वानराचा दफनविधी झाल्यानंतर हनुमंताला प्रणाम करून प्रत्येक जण आपापल्या घरी निघून गेला, भविष्यात दफन केलेल्या जागेवर वानराचे मंदिर उभारण्याचा सूर उपस्थितांमधून ऐकू येत होता.