खोपडी येथे विहिरीत पडून मोराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:58 PM2019-04-25T14:58:01+5:302019-04-25T14:58:15+5:30
सिन्नर: तालुक्यातील खोपडी बु॥ येथे विहिरीत पडलेल्या मोराला त्वरीत बाहेर न काढल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. वनखात्याला कळवूनही त्यांना मोराला बाहेर काढण्यासाठी पावले न उचलल्याने राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचलो. मात्र, त्यापूर्वीच मोराचा मृत्यू झाल्याचे वनखात्याने म्हटले आहे.

पाण्याच्या शोधात फिरणारा मोर खोपडी बु॥ येथील थोरात मळ्यातील दशरथ कचरु गुरूळे यांच्या शेतातील विहिरीत पडला. विहिरीत थोडेसेच पाणी असल्याने एका बाजूला कोरड्या जागेवर मोर उभा असल्याचे परिसरातील रहिवाशांना दिसला. गणेश घोलप, रंगनाथ गुरूळे यांनी पोलीस पाटील जनार्दन गुरूळे यांना मोर पडल्याची माहिती दिली. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरिक्षक साहेबराव पाटील यांना माहिती दिली. त्यांनी वनखात्याला माहिती देऊन तातडीने मोराला बाहेर काढण्यासाठी माणसे पाठवण्यास सांगितले. मात्र, वनखात्याने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. रात्रीतून विहिरीला थोडे पाणी वाढल्याने मोर पाण्यातच कसा बसा उभा असल्याचे त्यांना दिसले. पुन्हा पोलीस पाटील व इतरांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी केले. मात्र, त्यांची येण्याची लक्षणे न दिसल्याने परिसरातील एकाने विहिरीत उतरून मोराला बाहेर काढले. रात्रभर पाण्यात उभा राहिल्याने गारठलेला मोर जमिनीवर पायही टेकू शकत नव्हता. त्याला काही वेळ उन्हातही ठेवण्यात आले. मात्र, थंडीने गारठलेल्या मोराचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास तासाभराने वनखात्याचे थोरात व शिंदे नावाचे कर्मचारी तेथे आले. तुम्ही वेळेवर आले असते तर मोराला दवाखान्यात नेता आले असते व मोराचे प्राण वाचू शकले असते असा आरोप करीत रहीवाशांनी दोघांनाही चांगलेच फैलावर घेतले.
परिसरातील एका पशुवैद्यकीय अधिका-यालाही रहिवाशांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून मोरावर उपचारासाठी येण्याची विनंती केली होती. मात्र, हे अधिकारी बाहेरगावी असल्याने ते येऊ शकले नाहीत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हळकुंडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मोराचा दफनविधी करण्यात आला.