नाशिक जिल्ह्यात वीज कोसळून अंगण झाडणाऱ्या महिलेचा मृत्यू
By धनंजय वाखारे | Published: May 12, 2024 03:42 PM2024-05-12T15:42:59+5:302024-05-12T15:43:13+5:30
त्यांना उपचारार्थ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
महेश गुजराथी
चांदवड (नाशिक) : जिल्ह्यात गेली दोन दिवसांपासून बेमोसमी पावसाचा तडाखा बसत आहे. तालुक्यात रविवारी (दि.१२) सकाळी ६ वाजेच्या सुमारास भाटगाव रोड, परसूल येथे अंगण झाडत असलेल्या महिलेवर वीज कोसळून तिचा मृत्यू झाला आहे.
शोभा कैलास निकम (४८, रा. भाटगाव रोड, परसूल, ता. चांदवड) असे या मृत महिलेचे नाव आहे. सकाळी ६ वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. यावेळी घरासमोरील अंगण झाडत असताना शोभा निकम यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मुलगा पोपट निकम याने चांदवड पोलिस ठाण्याला खबर दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास हवालदार मन्साराम बागूल करीत आहेत.
याशिवाय मेसनखेडेतील दत्तू ठोंबरे यांची म्हैस वादळी पावसाने, तर भुत्याने येथील जगन्नाथ महाले यांची गाय वीज पडून ठार झाली. याबाबत पंचनामा केल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान, शनिवारी (दि.११) रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाला होता.