डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू; १५ दिवसांत ५० वर रुग्ण आढळले

By Suyog.joshi | Published: October 25, 2023 08:02 PM2023-10-25T20:02:58+5:302023-10-25T20:03:11+5:30

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांना याबाबतचे निवेदन बुधवारी, दि. २५ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे.

Death of suspected dengue patient; More than 50 patients were found in 15 days | डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू; १५ दिवसांत ५० वर रुग्ण आढळले

डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू; १५ दिवसांत ५० वर रुग्ण आढळले

नाशिक : शहरातील कर्मयोगीनगरमध्ये एका डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. नागरिकांच्या आरोग्याचे, जीविताचे रक्षण करण्यासाठी प्रभागात डास निर्मूलन आणि स्वच्छता मोहीम राबवावी. सर्व संबंधित विभागांना योग्य त्या सूचना देऊन आवश्यक उपाययोजना दोन दिवसांत कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. 

महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांना याबाबतचे निवेदन बुधवारी, दि. २५ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे. प्रभाग २४ मध्ये डेंग्यू, मलेरियासह साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. घरोघरी रुग्ण तापाने फणफणले आहेत. गोविंदनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, जुने सिडको, उंटवाडी, मंगलमूर्तीनगर, जगतापनगर, बाजीरावनगर, सद्गुरूनगर, सदाशिवनगर, बडदेनगर, पांगरे मळा, खोडे मळा, काशिकोनगर, बेळे कॉलनी, कृष्णबन कॉलनी, भुजबळ फार्म परिसर यासह संपूर्ण प्रभाग २४ मध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, डेंग्यू, मलेरियासह विविध आजारांनी थैमान घातले आहे. रविवारी, दि. २२ ऑक्टोबर रोजी कर्मयोगीनगरमधील एका डेंग्यू संशयित रुग्णाचा मृत्यू झाला. 

आतापर्यंत सुमारे पन्नासहून अधिक डेंग्यूचे रुग्ण पंधरा दिवसांत आढळले आहेत. यापूर्वी सोमवारी, दि. २३ ऑक्टोबर रोजी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांना निवेदन दिल्यानंतर बुधवार, दि. २५ ऑक्टोबरपासून डास प्रतिबंधक औषध फवारणी सुरू झाली आहे. संपूर्ण प्रभागात डास निर्मूलन मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत याबाबत कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, चारुशीला गायकवाड, बाळासाहेब मिंधे, धवल खैरनार, संगीता देशमुख यांनी दिला आहे.

अद्याप मृत्यू झालेल्या संशयिताचा कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. याबाबत मलेरिया विभागाकडून माहिती मागविण्यात आली आहे, त्यानंतरच स्पष्ट निदान करता येईल.
- डॉ. तानाजी चव्हाण, आरोग्याधिकारी, महापालिका

Web Title: Death of suspected dengue patient; More than 50 patients were found in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.