बिबट्याच्या हल्ल्यात परमोरीच्या बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:47 AM2018-09-04T01:47:10+5:302018-09-04T01:47:42+5:30
तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीनवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन वर्षांतील ही तिसरी घटना आहे.
दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीनवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन वर्षांतील ही तिसरी घटना आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, परमोरी शिवारात ज्ञानेश्वर दिघे यांच्या टमाटाच्या शेतात कुटुंबातील महिला सदस्य काम करत होत्या. शेजारीच लहान मुलेही खेळत होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेजारील उसातून बिबट्याने तेथे खेळत असलेल्या सार्थक ज्ञानेश्वर दिघे (वय ३) याच्यावर
हल्ला चढवला आणि त्याच्या मानेचा लचका पकडत त्याला उसाच्या शेतात ओढत नेले. सदर घटना समजताच सार्थकची आई व आजीने आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी जमा झाले आणि त्यांनी उसात शोध घेतला असता बिबट्याने धूम ठोकली. जखमी सार्थक यास तातडीने दवाखान्यात उपचारास नेण्यात आले; परंतु दिंडोरी ग्रामीण रु ग्णालयातील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार नरहरी झिरवाळ यांनी वनविभागाला सूचना देत तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात म्हेळुस्के येथे श्रीरंग हर्षवर्धन खिरकाडे व लखमापूर येथील विवेक बिंद या बालकांचा मृत्यू झाला होता.
भय इथले संपत नाही
दिंडोरी तालुक्यातील कादवा कोलवन नदीकिनारी परिसरातील सर्व गावे गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्यांच्या दहशतीखाली असून, आतापर्यंत तीन बालकांचा जीव गेला आहे. दोन बालकांसह एक महिलेवरही हल्ला झाला होता. सुदैवाने त्या बचावल्या. याशिवाय बिबट्यांनी अनेकांची पाळीव प्राणी फस्त केले आहेत. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी डझनभर पिंजरे लावले आहेत. मात्र भीती कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या रविवारीच एक शेतकऱ्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला होता. ग्रामस्थांनी वनविभागाला कळवले; परंतु त्यावर उपाययोजना झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.