पाण्यातील विद्युत प्रवाहाने रिक्षाचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 01:17 AM2019-09-26T01:17:30+5:302019-09-26T01:17:52+5:30
पावसामुळे अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात विद्युत रोहित्राच्या खांबांमध्ये वीजप्रवाह उतरल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून रिक्षा घेऊन जाणाऱ्या चालकाला शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास घडली.
सिडको : पावसामुळे अंबड येथील महालक्ष्मीनगर भागात विद्युत रोहित्राच्या खांबांमध्ये वीजप्रवाह उतरल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून रिक्षा घेऊन जाणाऱ्या चालकाला शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास घडली. दानिश आयमान शेख (२५, रा. महेबूबनगर, वडाळागाव) असे मयत झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडाळागाव परिसरातील महेबूबनगर भागात राहणारा दानिश शेख हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे तो प्रवाशांना घेऊन बुधवारी सायंकाळच्या सुमारास अंबड महालक्ष्मीनगर येथे आला.
बुधवारी दुपारपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे महालक्ष्मीनगरच्या एका महावितरण कंपनीच्या रोहित्राच्या खांबामध्ये वीजप्रवाह उतरून साचलेल्या पाण्यात आला. या पाण्यातून दानिश रिक्षा चालवित मार्गस्थ होत होता, मात्र अचानक रिक्षा नादुरुस्त होऊन बंद पडली. त्यामुळे दानिशने खाली उतरून रिक्षा ढकलून पुढे नेण्याचा प्रयत्न केला यावेळी पाण्यात उतरलेल्या वीजप्रवाहाचा त्यास झटका बसला. यामुळे दानिशचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.