क्षणाक्षणाला वाढतेय मरण, स्मशानात पुरेना सरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:13 AM2021-04-19T04:13:13+5:302021-04-19T04:13:13+5:30
नाशिक : शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अमरधाममध्ये देखील ताण वाढू लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर ...
नाशिक : शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अमरधाममध्ये देखील ताण वाढू लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत आणि गॅसदाहिनी उपलब्ध असल्या तरी सर्वच ठिकाणी त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपरिक बेडवरच लाकूड फाट्याचा उपयोग करून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गेल्या जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत सरासरी ३४४ टन लाकूड फाटा अंत्यसंस्कारासाठी लागला आहे. मात्र, एप्रिल महिन्यात अगदी पंधरा दिवसांतच ६१२ टन लाकूड अंत्यविधीसाठी लागले आहे.
नाशिक शहर विभागात सुमारे ११ स्मशानभूमी आहेत. त्यातील हिंदू स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार योजनेअंतर्गत सहा ते आठ मण लाकूड, रॉकेल, गेावऱ्या मोफत दिले जाते. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर सुरुवातीला या आजारामुळे मृत्यू झालेल्यांवर विद्युत आणि गॅस शव दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार केले जात होते. परंतु तीन तीन दिवसांचे वेटिंग सुरू झाल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी पारंपरिकक बेडचा देखील अंत्यसंस्कारासाठी वापर सुरू केला आहे. त्यानंतर आता कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्काराला पूर्वीप्रमाणेच साहित्य दिले जात आहे. सध्या तर एप्रिल महिन्यात कोरोनाचा कहर जाणवत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत असून लाकूड फाट्याचा वापर अधिक होत आहे. गेल्या तीन महिन्यांचा आढावा घेतला तर पंचवटीत अमरधाममध्ये जानेवारीत ७०, फेब्रुवारीत ७९० तर मार्च मध्ये २०० टन लाकूड लागले तर १५ एप्रिलपर्यंत १५० टन लाकडाचा वापर झाला आहे. नाशिकरोड मध्ये जानेवारीत ३०, फेब्रुवारीत ३९ तर मार्च महिन्यात ७० आणि १५ एप्रिलपर्यंत १३० टन लाकडाचा वापर झाला आहे. नाशिक पूर्व विभागात जानेवारीत ९३, फेब्रुवारीत ९२, मार्च महिन्यात दीडशे तर १५ एप्रिलपर्यंत १६७ टन लाकूड फाट्याचा वापर झाला आहे. सिडको विभागातील अमरधाममध्ये जानेवारीत ४३, फेब्रुवारीत ४७, मार्च महिन्यात ६० तर १५ एप्रिलपर्यंत १२० टन लाकूड वापरले. सातपूर विभागात जानेवारीत १८ टन, फेब्रुवारीत २१, मार्च महिन्यात ३० तर १५ एप्रिलपर्यंत ४५ टन लाकूड वापरले गेले आहे.
इन्फो...
शहरातीलच पाच विभागातील स्मशान भूमीत
जानेवारी- २५४
फेब्रुवारी- २६९
मार्च - ५१०
एप्रिल- ६१२