जिल्ह्यात दहा बाधितांचा मृत्यू; २४ तासांत ३८८ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:50 AM2020-07-16T00:50:44+5:302020-07-16T00:54:53+5:30
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. बुधवारी (दि. १५) महानगरात सात तर ग्रामीणमधील ३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३५९वर पोहोचली आहे. शिवाय दिवसभरात शहरात २२४ तर ग्रामीणमध्ये १६४ असे तब्बल ३८८ जण रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ७७६३ वर गेली.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. बुधवारी (दि. १५) महानगरात सात तर ग्रामीणमधील ३ नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३५९वर पोहोचली आहे. शिवाय दिवसभरात शहरात २२४ तर ग्रामीणमध्ये १६४ असे तब्बल ३८८ जण रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ७७६३ वर गेली.
महानगरात बुधवारी पुन्हा एकदा बाधितांचा आकडा दोनशे पार होऊन तब्बल २२६पर्यंत पोहोचल्याने बाधितांच्या संख्येत प्रचंड मोठी भर पडल्याने यंत्रणेच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे.
दरम्यान जिल्ह्णात नवीन दहा जणांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३५९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरातील १८८, मालेगाव शहरातील ७९, नाशिक ग्रामीणमधील ७८ तर जिल्हाबाह्य १४ मृतांचा समावेश आहे. दरम्यान एकीकडे नवीन संशयित दाखल होण्याचे प्रमाण वाढत असतानाच अहवालांचे प्रलंबित राहण्याचे प्रमाणदेखील खूप वाढले आहे. बुधवारी तब्बल ८९१ रुग्णांचे अहवाल प्रलंबित राहिले असून, प्रशासनाला त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
मालेगाव येथे २३ नवे बाधित आढळले आहेत. बाधितात चंदनपुरी, सोयगाव, जाजूवाडी, दरेगाव, कॅम्प, सायने बुद्रुक, संगमेश्वर, खाकुर्डी, अजंग येथील बाधितांचा समावेश आहे. सिन्नर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. २५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ही एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या
आहे.
१०२८ नवीन संशयित
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून बुधवारी एकूण १०२८ नवीन संशयित दाखल झाले आहेत. त्यात नाशिक मनपा रुग्णालयांमध्येच तब्बल ८१५, ग्रामीण रुग्णालयांमध्ये १४३, जिल्हा रुग्णालय ११, डॉ. पवार मेडिकल कॉलेज ११ आणि मालेगाव रुग्णालयातील ८ नवीन संशयितांचा समावेश आहे. एक हजारावर नवीन संशयित आढळून येण्याची ही घटना आठवडाभरात दुसऱ्यांदा घडली आहे.