बलात्कारानंतर आदिवासी युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 05:15 PM2019-03-27T17:15:13+5:302019-03-27T17:15:44+5:30

गुजरात हद्दीतील घटना : संतप्त ग्रामस्थांची पोलिस ठाण्याकडे धाव

 Death of a tribal woman after rape | बलात्कारानंतर आदिवासी युवतीचा मृत्यू

बलात्कारानंतर आदिवासी युवतीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देया घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कापराडा पोलिस ठाणे गाठून आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत युवतीचे प्रेत ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला.

वेळुंजे : बोरमाळ देवडोंगरा ता. त्र्यंबकेश्वर येथील गरीब आदिवासी कुटुंबीयातील २२ वर्षीय युवतीला गुजरात राज्यातील दमणगंगा नदीलगत असलेल्या टिटवमाळ जंगलात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना २३ मार्च रोजी घडली होती. दरम्यान, जखमी युवतीवर उपचार सुरु असताना बुधवारी (दि.२७) पहाटे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कापराडा पोलिस ठाणे गाठून आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत युवतीचे प्रेत ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. अखेर, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर युवतीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिचे नातेवाईक सुरतला रवाना झाले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. २३ मार्च रोजी बोरमाळ देवडोंगरा, ता.त्र्यंबकेश्वर येथील २२ वर्षीय युवतीला रात्रीच्या वेळेस तिच्या गावापासुन पाच किमी अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील दमणगंगा नदी लगत टिटवमाळ (उसर) येथे जंगलातील शेतात नेण्यात आले आणि ओढणीने गळा आवळुन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचवेळी तिच्या डोक्यात दगड मारु न तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करत संशयित आरोपीने पळ काढला. सकाळी शेतात गेलेल्या लोकांना सदर युवती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध आवस्थेत आढळुन आल्यानंतर तिला वलसाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील उपचाराकरीता सुरत येथे नेण्यात आले असता बुधवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी युवती बेवारस सापडल्याने सोशल मीडीयातुन प्रसिद्धी झाली. सदर युवती बोरमाळ देवडोंगरी येथील असल्याचे समजल्यावर व लगतच्याच गुजरात राज्यातील घोटवळ येथील गणेशभाई काळुभाई नेवाल या मुलानेच हा प्रकार केल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर एकच संतापाची लाट उसळली. गुजरात हद्दीलगत सततच्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कापराडा पोलिस ठाणे गाठून आरोपीच्या अटकेची मागणी केली.
आरोपीस अटक
घटनेचे गांभीर्य ओळखुन गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व हरसुल पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव बडे हे कापराडा पोलिस स्टेशन येथे आले. त्यांनी समन्वय बैठक घेऊन आरोपीला ताब्यात घेतले तर यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी हद्दी लगतच्या गावांत सातत्याने पेट्रोलींग केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर सदर युवतीचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्याकरीता सुरतला रवाना झाले. दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या दमणगंगा नदीकिनाऱ्या लगतच्या काही गावांत सातत्याने घडणाऱ्या अनुचित घटनांमुळे दोन्हीकडील जनतेत दुरावा निर्माण होत असुन भविष्यात कुठलीही वाईट घटना घडुन नये या करिता गुजरात राज्यातील वलसाड जिल्हा पोलीसांना त्र्यंबकेश्वर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

Web Title:  Death of a tribal woman after rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.