अपघातात दोन भावी सनदी लेखापालांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:58 AM2018-04-25T00:58:13+5:302018-04-25T00:58:13+5:30
मुंबईमध्ये सनदी लेखापालाचे शिक्षण घेणाऱ्या दोघा भावी सनदी लेखापालांचा मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या शुक्रवारी अपघात झाला होता. या अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या दोन्ही युवकांचा मंगळवारी (दि.२४) वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इंदिरानगर : मुंबईमध्ये सनदी लेखापालाचे शिक्षण घेणाऱ्या दोघा भावी सनदी लेखापालांचा मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या शुक्रवारी अपघात झाला होता. या अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या दोन्ही युवकांचा मंगळवारी (दि.२४) वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इंदिरानगर परिसरातील आदर्श सोसायटी व सारंगीनगर परिसरात राहणारे सुश्रुत नयन पाटील (२३), कुणाल भरत खिंवसरा (२१) हे दोन्ही मित्र शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास चारचाकी मोटारीने (एमएच १५ डीएम.१६११ ) उड्डाणपुलावरून जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारीला ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले होते. दोघांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू होते. दोघेही सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षाला शिकत होते. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वासननगर परिसरात एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले होते. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. सुश्रुत व कुणाल दोघांच्या डोक्याला जबर मार लागला होता. दरम्यान, मंगळवारी पुढील उपचारासाठी कुणालला मुंबईला हलविण्यात आले होते; मात्र महामार्गावरून जात असताना वाटेत त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. अचानकपणे दोघा युवकांचा एकाच दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण इंदिरानगर परिसरात शोककळा पसरली आहे. कुणाल हा अशोका शाळेचा माजी विद्यार्थी होता. तो नाशिक येथे सनदीलेखापालाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आर्टीकलशिप करत होता. तसेच पाटील हा पुण्यामध्ये आर्टीकलशिप करत होता. हे दोघे पुढील काही महिन्यात सिएची अंतीम परिक्षा देणार होते.