वीजप्रवाहाच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू, सिडको वसाहतीतील मृत्यूंचा सिलसिला संपेना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 11:25 AM2019-09-29T11:25:26+5:302019-09-29T11:28:06+5:30
सिडको उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात केदारे कुटुंबातील सासू सुनेचा महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या तारांचा धक्का जागीच मृत्यू झाला.
नाशिक : सिडको उत्तमनगर भागातील शिवपुरी चौकात केदारे कुटुंबातील सासू सुनेचा महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या तारांचा धक्का जागीच मृत्यू झाला. बुधवारी अशाच पद्धतीने वीजप्रवाह पाण्यात उतरल्यानं एका रिक्षाचालकाचाही करंट लागून बळी गेला होता. रविवारी (दि.29) सकाळी वीज तारेच्या घडलेल्या घटनेत दोघे भाऊ-बहीण गंभीर जखमी झालेत. नंदिनी शांताराम केदारे (23), शुभम शांताराम केदारे (19) हे भाऊ बहीण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, शेकडो रहिवाशांनी रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना दोषी धरत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सिडकोमध्ये दाट लोकवस्ती असून, तिथे इमारतीला लागूनच विद्युत पोल टाकण्यात आले आहेत.
त्यामुळे या वीजतारांनी आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच या वीजतारा भूमिगत कराव्यात अशी मागणीही गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांनी लावून धरली आहे. परंतु स्थानिक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेकडो रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आज ठिय्या आंदोलन केलं आहे.