खाकुर्डीत ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 01:59 AM2019-03-22T01:59:37+5:302019-03-22T02:00:30+5:30
मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे गावाजवळ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीभोवती मातीचा भराव टाकण्याचे झालेले काम पाहण्यासाठी गेलेले दोन जण मातीच्या ढिगाऱ्यासोबत विहिरीत कोसळल्याने त्यांचा दबून मृत्यू झाला. गुरुवारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
वडनेर : मालेगाव तालुक्यातील खाकुर्डी येथे गावाजवळ ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीभोवती मातीचा भराव टाकण्याचे झालेले काम पाहण्यासाठी गेलेले दोन जण मातीच्या ढिगाऱ्यासोबत विहिरीत कोसळल्याने त्यांचा दबून मृत्यू झाला. गुरुवारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
खाकुर्डीत दुपारी सार्वजनिक विहिरीच्या भराव टाकण्याचे काम सुरू होते. विहिरीच्या काठावर उभे राहून काम बघत असताना लगतचा ढिगारा विहिरीत कोसळला. त्यात ते दोघे दबले गेले. त्यांना वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. ग्रामस्थांनी सलग दोन तास राबत दोघांना ढिगाºयातून काढून वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले. दीपक कासार (३५) व समाधान जाधव (३२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सलग दोन तास पोकलँडद्वारे ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी तसेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. (पान ५ वर)
घटनास्थळी वडनेर खाकुर्डीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे हजर झाले होते. तहसीलदार रजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांचे शव शवविच्छेदनासाठी मालेगाव सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. दिपक कासारच्या पश्चात एक भाऊ आहे. तर अन्य मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा व आई असा परिवार आहे. वडनेर खाकुर्डी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुटीने केला घात
धूलिवंदनाची बँकेला तसेच तहसील कार्यालयास सुट्टी असल्याने दोघेही मित्र सणानिमित्त घरीच होते. समाधान जाधव हा वडनेर येथील महाराष्टÑ बँकेचा बँकमित्र म्हणून काम करीत होता.