घराच्या आगीत पत्नीचा मृत्यू : पती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:12 AM2018-06-13T01:12:55+5:302018-06-13T01:12:55+5:30
गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रुवनगरमध्ये बांधकामाच्या साइटवरील वॉचमनच्या खोलीस अचानक लागलेल्या आगीत झोपलेल्या दांपत्यापैकी पत्नीचा भाजून मृत्यू, तर पती गंभीर जखमी भाजल्याची घटना मंगळवारी (दि़ १२) मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रुवनगरमध्ये घडली़
नाशिक : गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रुवनगरमध्ये बांधकामाच्या साइटवरील वॉचमनच्या खोलीस अचानक लागलेल्या आगीत झोपलेल्या दांपत्यापैकी पत्नीचा भाजून मृत्यू, तर पती गंभीर जखमी भाजल्याची घटना मंगळवारी (दि़ १२) मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रुवनगरमध्ये घडली़ आयेशा खातून समशेर (३५,रा़ धु्रवनगर, गंगापूर, नाशिक, मूळ रा़ बिहार) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, जखमी समशेर अमरेंद्र शहा (३५) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धु्रवनगरमध्ये आदित्य कन्स्ट्रक्शनची बांधकामाची साइट सुरू आहे़ या साइटवरील ठेकेदार पंडित यांनी नुकतेच भिवंडी येथून समेशर अमरेंद्र शहा व त्याची पत्नी आयेशा खातून समशेर यांना वॉचमन म्हणून कामास ठेवले होते़ या दोघांना राहण्यासाठी साइटजवळ पत्र्याची खोली बांधण्यात आली असून, यामध्ये हे दोघे पती-पत्नी राहत होते़ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका नागरिकाने फोन करून या खोलीला आग लागल्याची माहिती दिली़ त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माळी हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असता या खोलीतून मोठ्या प्रमाणात धूर येत होता. उपनिरीक्षक माळी हे सहकाºयांसह मोबाइलच्या बॅटरीच्या साहाय्याने खोलीत गेले असता आयेशा समशेर ही शंभर टक्के जळाल्याने मयत झालेली होती़ तर तिचा पती समशेर हा मदत मागण्यासाठी इतरत्र पळत होता़ पोलिसांचे वाहन पाहिल्यानंतर तो पोलिसांजवळ आला़ या आगीमध्ये तो चाळीस टक्के भाजला असून, त्यास पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ दरम्यान, या खोलीस आग नेमकी कशामुळे लागली? पती-पत्नीचे वाद झाले होते का? याबाबत पोलीस माहिती घेत आहेत़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़