वीजप्रवाहच्या धक्क्याने वृध्देसह युवकाचा नाशिकमध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 09:18 PM2018-06-07T21:18:24+5:302018-06-07T21:18:24+5:30
रविवार पेठेमधील अत्यंत जुन्या कौलारु घरांची चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमाणी चाळमधील घर क्रमांक ६१० ब मध्ये राहणा-या प्रमिला देशमुख या संध्याकाळी बाहेर पडत असताना उंबरठ्यावर त्यांना वीजप्रवाहाचा धक्का बसला.
नाशिक : रविवार पेठेमधील निमाणी चाळीतील देशमुख यांच्या घरात वीजप्रवाह उतरल्याने संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वीजप्रवाहचा धक्का लागून घराच्या उंबरठ्यावर प्रमिला देशमुख (७७) कोसळल्या. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी असलेला सनी सावंत या युवकाने त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली; मात्र त्याला अपयश आले. अत्यवस्थ प्रमिला यांना उचलण्याचा सनीने प्रयत्न केला मात्र त्यालाही वीजप्रवाहचा धक्का बसला व तो जमीनीवर कोसळला. या घटनेत प्रमिला व सनी या दोघांचा मृत्यू झाल्याने निमाणी चाळीवर शोककळा पसरली आहे.
गुरूवारी (दि.७) मध्यरात्री झालेल्या मान्सुनपुर्व वादळी पावसानंतर शहरामधील वीजपुरवठा रात्री खंडीत झाला होता. तसेच सकाळी काही भागांमध्ये वीजपुरवठा विस्कळीत राहिला. रविवार पेठेमधील अत्यंत जुन्या कौलारु घरांची चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमाणी चाळमधील घर क्रमांक ६१० ब मध्ये राहणा-या प्रमिला देशमुख या संध्याकाळी बाहेर पडत असताना उंबरठ्यावर त्यांना वीजप्रवाहाचा धक्का बसला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून जवळच ओट्यावर बसलेल्या सनीने त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. सनीने मदतीसाठी घेतलेली धाव अपयशी ठरली आणि देशमुख यांच्यासह सनीवर काळाने झडप घातली. अत्यवस्थ अवस्थेत दोघांना रहिवाशांनी उपचारार्थ रुग्णालयात हलविले; मात्र वैद्यकिय अधिका-यांनी तपासून मयत घोषित केले. देशमुख या घरामध्ये एकट्या राहत होत्या. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तसेच सनी हा कटुंबातील कर्ता पुरूष होता. तो खासगी एजन्सीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस होता. त्याच्या पश्चात आई, बहीण, दोन भाऊ असा परिवार आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.