सटाणा राष्ट्रवादीत वाद
By Admin | Published: February 5, 2017 11:56 PM2017-02-05T23:56:11+5:302017-02-05T23:56:28+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : रविवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड
सटाणा : जिल्हा परिषद निवडणुकीत बागलाण तालुक्यातील जायखेडा गटात तिकीट मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती.मात्र रविवारी दुपारी अचानक पगार यांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनी प्रबळ दावेदारी केली होती .मात्र अचानक तिकीट कापले गेल्याने पक्षांतर्गत नवीन वादाला तोंड फुटले आहे. बागलाण तालुक्यातील जायखेडा गट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांचे होम ग्राउंड आहे. त्यामुळे पगार यांनी भामरे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते. पगार, माजी आमदार संजय चव्हाण यांनी तिकिटासाठी शब्द दिल्यामुळे भामरे यांनी प्रचाराला सुरु वात देखील केली होती. तिकीट आपल्यालाच असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष पगार यांचे भाऊबंद यतीन पगार यांनी कामांच्या जोरावर तिकीट आपल्यालाच मिळणार असे छातीठोक पणे सांगत थेट हायकमांडकडे तिकिटासाठी फिल्डिंग लावली होती. दरम्यान तिकीट आपल्यालाच मिळणार म्हणून शनिवारी मनीषा व महेंद्र या भामरे दाम्पत्याने वाजत गाजत पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आज रविवारी दुपारी जिल्हापरिषद सदस्य यतीन पगार यांनी देखील वाजत गाजत पक्षाचा व अपक्ष उमेदवारी अर्ज भरून अचानक अर्जाला एबी फॉर्म जोडल्याने कार्यकर्ते आवक झाले. गेल्या मिहना भरापासून तिकिटासाठी सुरु असलेल्या लढाईत पगार यांनी बाजी मारल्याने अनेक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह अन्य पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर नसतांना यतीन पगार यांनी थेट एबी फॉर्म जोडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या चिठ्ठीवर पगार यांनी शनिवारी रात्रीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून कोरा एबी फॉर्म मिळविला असल्याची चर्चा सुरु आहे. जिल्हाध्यक्ष पगार यांनी भामरे यांना तिकीट मिळविण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असतांना अचानक भामरे यांचे तिकीट कापल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये एन निवडणुकीत दुफळी झाल्याचे चित्र आहे. उमेदवारी संदर्भात तालुकाध्यक्ष भामरे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)