स्थायीच्या सभापतिपदावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:57 AM2019-07-16T00:57:26+5:302019-07-16T00:57:43+5:30
महापालिकेच्या अर्थकारणातील सर्वाधिक महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदावरून भाजपातील वाढत्या वादामुळे बंडाळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक : महापालिकेच्या अर्थकारणातील सर्वाधिक महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदावरून भाजपातील वाढत्या वादामुळे बंडाळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या समितीत मुळातच आमदार बाळासाहेब सानप यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना झुकते माप दिले गेले असून, त्यातच सभापतिपददेखील याच विभागाला देण्याची चर्चा असून, गणेश गिते प्रबळ दावेदावार आहेत. त्यामुळे सोमवारी (दि.१५) प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर यांना अन्य इच्छुकांनी भेटून तीव्र नाराजी व्यक्त करतानाच टोकाचे इशाारे दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे अंतर्गत बंडाची शक्यता लक्षात घेऊन पक्षाने सबुरीने घेण्याचे ठरविले असून, बुधवारी (दि.१७) उमेदवारी दाखल करतानाच ऐनवेळी उमेदवारी घोषित करण्याचा निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे भाजपाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नाशिकमध्ये आल्या असताना यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१५) हा प्रकार घडला आहे. महापालिकेत भाजपाचे बहुमत असले तरी या संस्थेवर वर्चस्वासाठी भाजपा आमदारांत सुरुवातीपासूनच स्पर्धा आहे. त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील नगरसेवकांना खूश करण्यासाठी धडपड सुरू आहेत. स्थायी समितीवर भाजपाच्या नऊ पैकी चार सदस्य हे पूर्व नाशिक मतदारसंघातील असून, हे सर्वच सभापतिपदाचे दावेदार आहेत. यात गणेश गिते, उद्धव निमसे, कमलेश बोडके आणि प्रा. शरद मोरे यांचा समावेश असला तरी गिते यांची दावेदारी अधिक बळकट मानली जात आहे. त्यामुळे सर्वच पदे आणि प्रतिनिधित्व नाशिक पूर्व मतदारसंघात आणि त्यातही पक्षातील आगंतुकांना द्यायचे काय असा वाद घुमसत आहेत. त्यामुळे मध्य नाशिकमधून आमदार फरांदे समर्थक स्वाती भामरे यांनीही सभापतिपदासाठी दावेदारी केली आहेत. परंतु काहीही झाले तरी गिते यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे सोमवारी भाजपाच्या राष्ट्रीय चिटणीस सरोज पांडे व संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. यावेळी इच्छुकांनी संघटनमंत्री किशोर काळकर याच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. काळकर यांनी सर्व इच्छुक म्हणणे ऐकून घेऊन घेतला आहे. सभापतिपदाच्या उमेदवारीबाबत अजून काणत्याही निर्णय झाला नसल्याचे सांगत, नाराजांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
बुधवारीच उमेदवारीचा फैसला
स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपात सुरू झालेले वाद बघता आता संघटन स्तरावर काळजी घेतली जात असून, उमेदवाराचे नाव बुधवारी (दि.१७) जाहीर करण्यात येणार आहे. सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी (दि.१८) होणार आहे. त्यासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यावेळी हा निर्णय घेणार आहे. अगोदर अर्ज दाखल करून ऐनवेळी माघार घेण्याचे ठरविल्यास बंडखोरीला वाव असल्याने बुधवारी एकच अधिकृत उमेदवार घोषित करून त्याचाच अर्ज दाखल करण्यात येणार आहे.