धनादेश न वटल्याने कर्जदारास सहा महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:16 AM2021-09-18T04:16:12+5:302021-09-18T04:16:12+5:30
सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था कळवण (नाशिक) ताहाराबाद येथून मंगला भामरे, रा. तांदूळवाडी यांनी ७ लाख रुपये इतके ...
सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था कळवण (नाशिक) ताहाराबाद येथून मंगला भामरे, रा. तांदूळवाडी यांनी ७ लाख रुपये इतके कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज थकबाकीत गेल्याने कर्जफेडीसाठी त्यांचे पती वसंतराव भामरे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा या बँकेचा स्वतःच्या खात्याचा रक्कम रुपये ६ लाख ९२ हजार ९९ रुपयांचा धनादेश दिलेला होता. पतसंस्थेने वेळोवेळी थकीत कर्ज भरण्यासाठी वसुलीचा तगादा लावत नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, मंगला भामरे यांनी कर्ज भरण्याबाबत असहकार्याची भूमिका घेऊन टाळाटाळ केली. त्यांचे पती वसंतराव भामरे यांनी पत्नीचे कर्ज भरण्याबाबत धनादेश दिलेला होता. तो देखील वटला नाही. त्यामुळे संस्थेने कलम १३८ अन्वये धनादेशधारकाला न्यायालयीन प्रक्रियेद्वारे नोटीस व समन्स बजावले होते.
इन्फो
थकबाकीदारांनी घेतला धसका
सदर याचिकेची सुनावणी होऊन धनादेशधारकास दोषी ठरवून ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच ९ लाख ४४ हजार ९९ रुपये द्रव्यदंडाची रक्कम न्यायालयात जमा करावी असा निकाल कळवण न्यायालयाचे दिवाणी न्यायधीश डी. एम. गित्ते यांनी दिला आहे. सदर गुन्ह्यात फिर्यादी पक्षाच्या वतीने कर्मचारी अशोक पवार व ॲड. के. बी. वाघ यांनी काम पहिले. सदर निकालामुळे पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांनी चांगलाच धसका घेतला आहे.