नाशिकरोडला भक्तिभावात निरोप
By admin | Published: September 28, 2015 10:44 PM2015-09-28T22:44:57+5:302015-09-28T22:45:53+5:30
नाशिकरोडला भक्तिभावात निरोप
नाशिकरोड : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, गुलालाची उधळण करत बालगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला.
गेल्या ११ दिवसांपासून घराघरांत व सोसायटी-कॉलनी, सार्वजनिक ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्यासाठी रविवारी सकाळपासूनच सर्वत्र लगबग दिसत होती. देवळालीगाव वालदेवी नदीपात्रात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी असल्यामुळे श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. मनपाने मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी नियोजन केले होते. मात्र वालदेवी नदीपात्राच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
देवळालीगाव, विहितगाव, वडनेर वालदेवी नदीतीरावर जेलरोड दसक गोदावरी नदी, चेहेडी दारणा नदी, आगरटाकळी आदि ठिकाणी भाविक व मंडळांनी सकाळपासून लाडक्या श्री गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती. मनपाने देवळालीगाव, जेलरोड, दसक, वडनेर, विहितगाव, मनपा शाळा १२५, जेलरोड नारायणबापू चौक, शिखरेवाडी, जेतवननगर, चेहेडी या नऊ ठिकाणी मूर्तींचे दान व निर्माल्य संकलित करण्यासाठी केंद्र उभारले होते. जलप्रदूषण टाळण्यासाठी बहुसंख्य भाविक, मंडळांनी आपल्या मूर्ती मनपाच्या मूर्ती दान केंद्रावर जमा करण्यासाठी गर्दी केली होती.
एकमेव मिरवणूक
नाशिकरोडची मुख्य श्री गणपती विसर्जनाची मिरवणूक कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे. दुष्काळजन्य परिस्थिती, सिंहस्थ कुंभमेळा व आर्थिक मंदी यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. त्यामुळे सार्वजनिक लहान-मोठ्या मंडळांनी आपापल्या भागातून वाजत-गाजत मिरवणूक काढून लाडक्या श्री गणरायाचे विसर्जन केले. तर मुख्य मिरवणुकीत नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा एकमेव चित्ररथ निघाला होता. त्या चित्ररथापुढील आदिवासी नृत्य आकर्षण ठरले होते.
जेलरोडला गर्दी
गेल्या काही वर्षांपासून जेलरोड दसक गोदावरी नदीपात्रात गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात मोठी गर्दी होत असते. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त प्रशस्त घाट बनविण्यात आल्याने भाविकांना श्री गणरायाचे विसर्जन करताना मोठी सुविधा निर्माण झाली होती. सकाळपासून दुपारपर्यंत दसक घाटावर थोड्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गणरायाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. तर देवळालीगाव वालदेवी पात्रात खराब पाणी असल्याने अनेक भाविकांनी रोकडोबावाडी-विहितगाव श्री अण्णा चतुर्मुख गणपती मंदिराजवळ कोल्हापूर टाईप बंधारा परिसरात श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती.
चेहेडी, विहितगाव, वडनेर,
आगर टाकळी, तपोवन आदि भागातदेखील श्री गणरायाचे विसर्जन
मोठ्या भक्तिभावात करण्यात
आले. (प्रतिनिधी)