साडेसहा लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:06 AM2019-04-17T01:06:58+5:302019-04-17T01:07:17+5:30
इलेक्ट्रिकल गाडीची डिलरशिप यवतमाळसाठी मिळवून देतो. तसेच वाहनही उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून त्याचा करारनामा करून घेतला.
इंदिरानगर : इलेक्ट्रिकल गाडीची डिलरशिप यवतमाळसाठी मिळवून देतो. तसेच वाहनही उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून त्याचा करारनामा करून घेतला. त्यानंतर संशयित अजयकुमार गवई, वैशाली गवई (दोघे रा. सावरकरनगर), वृषभ मंदोट यांनी फिर्यादी उत्तमराव धोंडबाजी वाघमारे (६६ रा.यवतमाळ) यांच्याकडून तब्बल सहा लाख ६३ हजार रुपये घेतले; मात्र डिलरशीपही दिली नाही आणि पैसेही दिले नाही, यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेऊन त्यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाघमारे हे त्यांच्या मुलासाठी व्यवसाय किंवा नोकरीच शोधत होते. त्याचवेळी पाथर्डीफाटा येथील के. के. ई. व्हेइकल्स या कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांची डिलरशिप द्यावयाची असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार वाघमारे यांनी या कंपनीचे संचालक अजयकुमार गवई यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक लाख रुपयांची अनामत रक्कम त्यांना धनादेशाद्वारे दिली. त्यानंतर काही दिवसांत कंपनीतर्फे वृषभ मंदोट यांच्याशी याबाबतचा करारनामाही करण्यात आला. त्यावेळी पाच लाख ६३ हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर या कंपनीकडून वाघमारे यांना डझनभर वाहने देण्यात येणार असल्याचे सांगून दरपत्रकही दिले. यानंतर वाघमारे यांनी यवतमाळ येथे जागाही भाडेतत्त्वावर घेतली. त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अजय गवई, वैशाली गवई व वृषभ मंदोट यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
फसवणूक झाल्याचे लक्षात आले
वाहने केव्हा येतात यासाठी नाशिक येथे संपर्क सुरू क रत संशयित गवई यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला; मात्र यांनी वाघमारे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी ही कंपनी वैशाली अजयकुमार गवई यांच्या मालकीची असल्याचे समजले. वाहन मिळत नसल्याने वाघमारे यांनी त्यांच्या पैशाची मागणी केल्यावर करारनामा रद्द करावा लागेल, असे सांगितल्याने वाघमारे यांनी करार रद्द करण्याचे पत्र दिले. मात्र त्यानंतरही त्यांची रक्कम किंवा वाहने न मिळाल्याने आपली फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात आले.