वृद्धेची फसवणूक; दीड लाखांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:26 AM2019-09-22T01:26:05+5:302019-09-22T01:27:10+5:30
अज्ञात इसमाने खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून ही साईबाबांची विभूती आहे. तुम्ही तुमचे दागिने काढून या नोटेत गुंडाळून ठेवा, असे सांगून ७६ वर्षीय वृद्धेची फसवणूक करून सोन्याची चेन व सोन्याची माळ असा एकूण एक लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओझर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
ओझर टाउनशिप : अज्ञात इसमाने खिशातून पाचशे रुपयांची नोट काढून ही साईबाबांची विभूती आहे. तुम्ही तुमचे दागिने काढून या नोटेत गुंडाळून ठेवा, असे सांगून ७६ वर्षीय वृद्धेची फसवणूक करून सोन्याची चेन व सोन्याची माळ असा एकूण एक लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओझर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
शुक्र वारी (दि. २०) सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास कमल मधुकर खरोटे (७६, रा. पगार गल्ली, शिवाजीरोड, ओझर) या सुमनबाई पल्हाळ यांचे घरासमोर गप्पा मारत असताना ३५ ते ४० वयोगटातील एक अज्ञात इसम त्यांच्याजवळ आला. त्याने, साईबाबांचे मंदिर बांधत आहोत. त्यासाठी तुम्ही दान करा, तुम्हाला वरकरणी होईल असे सांगून त्याच्या खिशातून पाचशे रुपयांची नोट काढली. ही साईबाबांची विभूती आहे. तुम्ही तुमचे दागिने या नोटेत गुंडाळून ठेवा असे सांगितले. कमल खरोटे यांनी गळ्यातील सोन्याची चेन व सोन्याच्या मण्यांची माळ काढून नोटेत गुंडाळून त्या इसमाकडे दिली. त्याने ते एका प्लॅस्टिक पिशवीत ठेवून पिशवी खरोटे यांच्यासमोर ठेवली व लगेचच तो मोटारसायकलवर बसून पळून गेला. खरोटेंनी पिशवी बघितली असता त्याने ठेवलेल्या पिशवीत दागिने नव्हते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ओझर पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.
महिलेच्या गळ्यातील पोत लंपास
मालेगाव : तालुक्यातील वडेल शिवारातील टिपे रोड येथे राहणाऱ्या महिलेकडे पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून अज्ञात भामट्याने महिलेच्या गळ्यातील १७ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मधुकर सीताराम शेलार यांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंगात लाल रंगाचा शर्ट, सावळा रंग, उंची साडेपाच फूट अशा वर्णनाच्या भामट्याने शेलार यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेली. पुढील तपास उपनिरीक्षक पाटील हे करीत आहे.
मालेगाव येथे फळविक्रेत्याकडून ग्राहकास मारहाण
मालेगाव : दुसरी प्लॅस्टिक पिशवी मागितल्याचा राग येऊन फळविक्रेत्याने ग्राहकास मारहाण केल्याप्रकरणी आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आत्माराम भगवान भालेराव यांनी फिर्याद दिली. त्यांचा भाऊ देवीदास भालेराव याने फळविक्रेता एकबाल (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याकडून फळे घेऊन प्लॅस्टिकच्या पिवशीत ठेवले. पिशवी फाटल्याने त्याने एकबालकडे दुसरी पिशवी मागितली. याचा राग येऊन संशयित एकबालने देवीदासला मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरी हे करीत आहेत.