मनात जिंकण्याचा निर्धार केला की अर्धी बाजी तुमची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:17 AM2021-09-12T04:17:38+5:302021-09-12T04:17:38+5:30
नाशिक : कोणताही सामना किंवा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण संघाने मनात जिंकण्याचा निर्धार केला की अर्धी बाजी तुमची झालेली ...
नाशिक : कोणताही सामना किंवा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण संघाने मनात जिंकण्याचा निर्धार केला की अर्धी बाजी तुमची झालेली असते. केवळ सकारात्मक पद्धतीने मनाला कसे उत्तेजित करायचे, संघ भावना व क्रीडा भावना कशा पद्धतीने आपल्या देहबोलीतून व नजरेतून व्यक्त करायच्या ते समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगत प्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी राज्य खो-खो स्पर्धेतील उपविजेत्या नाशिकच्या खो-खोपटू कन्यांशी संवाद साधला.
मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नुकतेच नाशिकमध्येसुध्दा या विषयावर विविध क्रीडा मार्गदर्शकांसाठी व राष्ट्रीय खेळाडूंसाठी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले की, क्रीडा क्षेत्राचे महत्त्व ओळखून हा प्राधान्याचा विषय करण्याचे औचित्य पाश्चिमात्य देशांनी दाखवून त्यानुसार पावले उचलली. त्यामुळेच तेथील देश आणि खेळाडूंनी ऑलिम्पिकच्या इतिहासात उत्तुंग भरारी घेतली. आपल्या देशात नेहमीप्रमाणे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे कोणालाही वाटले नाही. खेळाडूंना त्यांच्या अन्य मार्गदर्शनाबरोबरच मानसोपचार तज्ज्ञांची गरज असते, हे स्व. भीष्मराज बाम यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. पिढ्यान् पिढ्या ज्यांचा आवाज समाजव्यवस्था व सामाजिक परिस्थितीमुळे कधीही तुम्हा-आम्हाला ऐकू आला नाही. त्या समाजाचे ते प्रतिनिधीत्व करतात. पण अबोल असलेल्या या मुली मैदानात मात्र आपल्या खेळातूनच बोलून दाखवतात आणि तीच तुमची भाषा असल्याचेही डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले. विजयी झाल्यानंतर व पराभूत झाल्यानंतरही तो कसा स्वीकारायचा, याच्या छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स त्यांनी खेळाडूंना दिल्या. या सत्रासाठी दीपा खेडकर यांनी विशेष सहकार्य केले. खेळ हा गांभीर्याने घेण्याची गरज असून, त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांचे स्वागत संघटक मंदार देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक उमेश आटवणे यांनी केले. गीतांजली सावळे यांनी आभार मानले.
फोटो
११ खो-खो