युतीच्या निर्णयाचा चेंडू स्थानिक नेत्यांच्या ‘कोर्टात’
By admin | Published: September 9, 2016 02:06 AM2016-09-09T02:06:18+5:302016-09-09T02:06:34+5:30
मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत : स्वबळाची शक्यता; ११० जागा जिंकण्याचे टार्गेट
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाने कोणाशी युती करायची? याचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते घेतील, असे जाहीरपणे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-शिवसेना युतीबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांच्या कोर्टात ढकलला आहे.
नाशिक महापालिकेची निवडणूक महत्त्वाची असून, उत्तर महाराष्ट्रात या निवडणुकीचा परिणाम होणार आहे. त्यामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व पर्याय भाजपाकडून अवलंबिले जातील, असे चित्र आहे. १२० जागांपैकी किमान ११० जागा निवडून आल्या पाहिजेत. आगामी महापौर भाजपाचा झाला पाहिजे. भाजपाचा महापौर झाल्यास त्यांच्या सत्कारासाठी आपण पुन्हा नाशिकला येऊ, असे सांगतानाच भाजपाने स्वबळाचीही चाचपणी करण्याचे अप्रत्यक्ष संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मागील निवडणुकीत भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यावर त्याचा काही प्रमाणात पक्षाला फायदाच झाला. त्यामुळे आताही पोटनिवडणुकीच्या दोन जागांसाठी भाजपाने केंद्रात व राज्यात सत्तेत युती असलेल्या शिवसेनेशी दोन हात करीत विजय मिळविल्याने पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे युती करायची की नाही? याचा निर्णय स्थानिक पातळीवर नेत्यांनी घ्यायचा आहे. त्यासाठी राज्यस्तरावरून कोणावरही दबाव टाकला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितल्याचे कळते. आगामी महापालिका निवडणूक ही शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप व माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या वतीने लढली जाण्याची शक्यता या बैठकीनंतर वर्तविण्यात आली. (प्रतिनिधी)