प्रमाणपत्रावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
By admin | Published: March 7, 2017 11:35 PM2017-03-07T23:35:57+5:302017-03-07T23:36:14+5:30
सिन्नर : आरटीई प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने आक्रमक पवित्रा घेतला.
सिन्नर : आरटीई प्रमाणपत्र देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने आक्रमक पवित्रा घेतला असून, आठ दिवसांत आरटीई प्रमाणपत्र न मिळाल्यास त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सहविचार सभेत घेण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.
नाशिक येथे पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षण उपसंचालक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, भविष्यनिर्वाह निधी व वेतनपथक यांची सहविचार सभा पार पडली. व्यासपीठावर शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी एन. बी. औताडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, विज्ञान सल्लागार एम. एन. पाटील, वेतन पथक अधीक्षक गणेश फुलसुंदर आदि उपस्थित होते.
आठवडाभरात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आरटीई प्रमाणपत्र न दिल्यास त्यांचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार काढून घेण्याची शिफारस मुख्याधिकाऱ्यांना करण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक जाधव यांनी मुख्याध्यापक संघास दिले. याबाबत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करणार असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले. शिक्षक समायोजनाचा प्रश्न दोन दिवसांत सोडविणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी औताडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील ९६ विना अनुदानित शाळांचे मूल्यांकन झालेले असताना केवळ ५० शाळा २० टक्के अनुदानास शासनाने पात्र ठरविल्या आहेत, तर ४६ शाळा अनुशेषअभावी नाकारण्यात आल्या आहेत. या सर्व शाळांना त्वरित अनुदान न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुख्याध्यापक संघ व शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी दिला आहे. डीसीपीएस योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व शाळांची पगार बिले नॉनप्लॅनमध्ये आणावी, एकाकी पद असणाऱ्या शाळांमध्ये लिपिक व शिपाई पदास मान्यता द्यावी आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी प्रास्ताविक, तर एस. के. सावंत यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी एस. डी. शेलार, के. के. अहिरे, साहेबराव कुटे, गुफरान अन्सारी, माणिक मढवई, परवेझ शेख, शरद गिते, सी. पी. कुशारे, डी. एस. ठाकरे, एन. आर. देवरे, एस. के. देसले, रवींद्र जोशी, बाळासाहेब ढोबळे, भाऊसाहेब शिरसाठ, बी. व्ही. पांडे, संग्राम करंजकर, आर. पी. शिंदे, संजय गिते, के. डी. देवढे, बी. व्ही. देवरे, एस. के. भदाणे, हेमंत पाटील आदि उपस्थित होते. (वार्ताहर)