खंडोबा महाराज यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 04:54 PM2020-12-18T16:54:11+5:302020-12-18T16:55:42+5:30
वरखेडा : येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सव कोरोनाच्या संक्रमणामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत, यात्रा कमिटी व स्थानिक नागरिकांनी घेतल्याची माहिती खंडेराव मंदिराचे विश्वस्त विलास भागवत यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार राज्यातील इतर सर्वच यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चंपाषष्ठीला होणारी खंडेराव महाराज यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यात्रा सुरु राहिल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवताना अडचण येईल, यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे. चंपाषष्टी निमित्ताने भाविकांना खंडोबा मंदिरात दर्शनाचा लाभ घेता येईल, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. खंडोबा महाराजांची विधिवत पूजा - अर्चा करण्यात येणार आहे. परिसरातील भाविकांनी याची दखल घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन यात्रोत्सव कमेटीच्यावतीने करण्यात आले आहे.