शहरातील निर्बंधांचा निर्णय आयुक्तांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:15 AM2021-03-26T04:15:38+5:302021-03-26T04:15:38+5:30
नाशिक : शहरात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कठोर निर्बंध घालण्याबाबत प्रशासनानेच योग्य तो निर्णय घ्यावा, असे सांगून ...
नाशिक : शहरात सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने कठोर निर्बंध घालण्याबाबत प्रशासनानेच योग्य तो निर्णय घ्यावा, असे सांगून महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय आयुक्तांवरच सोपवला आहे. निर्णय कोणताही घ्या; मात्र त्याचे अचूक पालन केले पाहिजे. शहरात निर्बंध असूनही त्याचे यथायोग्य पालन होत नाही, असे सांगून महापौरांसह अन्य गटनेत्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याच बरोबर शहरात कोरोना चाचण्या वाढवा आणि त्याचबरोबर लसीकरणाला वेग द्या, अशीही मागणी केली आहे. शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यासंदर्भात गुरुवारी (दि.२५) महापौर सतीश कुलकर्णी यांनी आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली व उपाययोजनांबाबत आढावा घेतला. स्थायी समिती अध्यक्ष गणेश गिते, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. शहरात सध्या रोज दीड ते दोन हजारांच्या आसपास कोरोनाबाधितांची संख्या आढळून येत आहे. शहरात बाजारपेठेमध्ये व रस्त्यावर नागरिक मोठ्या संख्येने विनामास्क फिरत असून, फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने नाराजी व्यक्त करीत महापौरांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली. शहरात लसीकरण व तपासणी केंद्र वाढवण्याची मागणीही त्यांनी केली. बाधित रुग्ण हे गृहविलगीकरणात न राहाता बाहेर फिरत असल्याने त्यांचा इतरांशी संपर्क होऊन रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे पंचवटी मेरी, तपोवन येथील स्वामीनारायण शाळा, समाज कल्याण, ठक्कर डोम इत्यादी ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्याची सूचनाही महापौर, सतीश सोनवणे व जगदीश पाटील यांनी केली.
याबैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, उपायुक्त प्रशासन मनोज घोडे-पाटील, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता वनमाळी आदी अधिकारी उपस्थित होते.
इन्फो..
शहरात कठोर निर्बंध लागू करायचे किंवा नाही याबाबत आयुक्तांनी सर्व गटनेत्यांची बैठक घेऊन त्यात निर्णय घेऊन भूमिका कळवावी, असे आवाहन आयुक्तांनी केले; मात्र महापौरांनी याबाबत आयुक्तांवर निर्णय सोपवला आहे. याबाबत शुक्रवारी (दि. २६) होणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत सर्व मुद्दे मांडण्यात येऊन याबाबत जिल्हा प्रशासन योग्य ते निर्णय घेईल, असे आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी सांगितले.
===Photopath===
250321\25nsk_40_25032021_13.jpg
===Caption===
महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या दालनात आयोजित बैठकी प्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, जगदीश पाटील, व अन्य अधिकारी