शाळा ऑनलाइनच सुरू ठेवण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 10:21 PM2021-07-26T22:21:59+5:302021-07-26T22:24:03+5:30
लासलगाव : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रलंबित असलेल्या शिक्षकवर्गाचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करावे, असे आवाहन लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी केले.
लासलगाव : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रलंबित असलेल्या शिक्षकवर्गाचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करावे, असे आवाहन लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी केले.
शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याकरिता परिसरातील विद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी, निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी (दि.२६) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच होळकर उपस्थित होते. यावेळी उपसरपंच अफजल शेख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर होळकर, रामनाथ शेजवळ, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, डॉ. शेळके, डॉ. सुजित गुंजाळ, डॉ. विजय केंगे, डॉ. विकास चांदर आदी बैठकीस उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना विशद केल्या व त्या अनुषंगाने शाळा सुरू करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, याबरोबरच विविध विषयांवर चर्चा करत शाळा सुरू करण्यासंदर्भात विचार व्यक्त केले. सरपंचांनी यावेळी शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोनाबाधित रुग्णसंख्येबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. महिनाभरात एकही रुग्ण गावात नसल्यास शाळा सुरू करण्याबाबत शासनाचा आदेश असल्याने लासलगावसारख्या मोठ्या शहरात सध्या लगेच शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाइन शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, श्री महावीर जैन विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, सरस्वती विद्यालय, नॅशनल उर्दू हायस्कूल यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शहरातील विविध सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी प्रफुल्ल कुलकर्णी, विलास खैरनार, पवन सानप, मयूर राऊत, कल्पेश पवार यांचे बैठकीत सहकार्य लाभले. (२६ लासलगाव)