निमाची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 11:29 PM2020-07-31T23:29:36+5:302020-08-01T01:01:26+5:30
नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स अँड असोसिएशना (निमा)तील विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. निमा विश्वस्त मंडळाने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकरिणी बरखास्त करून विशेष कार्यकारी समितीची नेमणूक करून त्यांच्या हाती निमाचा कार्यभार सोपविला आहे. हा निर्णय घेऊन निमात विश्वस्त मंडळच सर्वोच्च असल्याचा संदेश दिला आहे, तर या निर्णयामुळे निमात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स अँड असोसिएशना (निमा)तील विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यातील शह-काटशहाचे राजकारण शमण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. निमा विश्वस्त मंडळाने विद्यमान पदाधिकारी आणि कार्यकरिणी बरखास्त करून विशेष कार्यकारी समितीची नेमणूक करून त्यांच्या हाती निमाचा कार्यभार सोपविला आहे. हा निर्णय घेऊन निमात विश्वस्त मंडळच सर्वोच्च असल्याचा संदेश दिला आहे, तर या निर्णयामुळे निमात पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून निमा विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांच्यात कलगी तुरा रंगला आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत शुक्रवारी (दि.३१) रोजी संपुष्टात येणार असल्याने विश्वस्त मंडळाची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी निमाच्या घटनेतील कलम ३४.१ व ३४.४ नुसार विशेष कार्यकारी समिती गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी निमाचे माजी अध्यक्ष विवेक गोगटे यांची, तर सरचिटणीसपदी आशिष नहार आणि खजिनदारपदी संदीप भदाणे यांची नियुक्ती केली आहे. या बैठकीस विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी, सदस्य मंगेश पाटणकर, धनंजय बेळे, संजीव नारंग उपस्थित होते. या बैठकीला निमंत्रित सदस्य असलेले विद्यमान अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण अनुपस्थित राहिलेत, अशी माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली, तर मावळत्या कार्यकारिणीकडून विशेष कार्यकारी समिती रविवारी पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार निमाची निवडणूक स्थगित झाल्याने विद्यमान पदाधिकाºयांकडे काळजी वाहू पदाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय धर्मादाय आयुक्तांकडे हा निर्णय प्रलंबित आहे.
निमा विश्वस्त मंडळाने एकाधिकारशाहीचा वापर करून अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. विश्वस्त मंडळ आणि पदाधिकारी यांच्यातील वादामुळे निमाची बदनामी होत आहे. हा वाद एकोप्याने मिटविणे आवश्यक आहे. वाद मिटणार नसेल तर विश्वस्त मंडळ आणि सत्ताधारी पदाधिकारी यांनी निमातून बाहेर पडावे आणि राजकारण थांबवावे.
सुधाकर देशमुख, सचिव, निमा