स्वग्राम आणि महाराष्ट्र दर्शनाची कर्मचाऱ्यांना मुभा वित्त विभागाचा निर्णय
By Admin | Published: June 17, 2015 01:49 AM2015-06-17T01:49:18+5:302015-06-17T01:49:40+5:30
स्वग्राम आणि महाराष्ट्र दर्शनाची कर्मचाऱ्यांना मुभा वित्त विभागाचा निर्णय
नाशिक : राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयापासून त्यांच्या स्वग्रामी (मूळगावी) जाण्यासाठी चार वर्षांच्या एका गटवर्षात दोेन स्वग्राम किंवा एक महाराष्ट्र दर्शन व एक स्वग्राम रजा प्रवास सवलत मंजूर करण्याचा निर्णय वित्त विभागाने १० जूनच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे. स्वग्राम योजनेत कर्मचाऱ्याचे कायम वास्तव्याचे ठिकाण व त्याच्या सेवापुस्तकात नोेंदविलेले गाव किंवा योग्य त्या कारणास्तव घोषित केलेले अन्य ठिकाण (मालकीची स्थावर मालमत्ता, जवळच्या नातेवाइकांचे म्हणजे आई-वडील, भाऊ यांचे कायम वास्तव्याचे ठिकाण) कर्मचाऱ्याच्या मुख्यालयापासून त्याने घोषित केलेल्या स्वग्रामी जाण्यासाठी ही सवलत असल्याने त्यासाठी राज्यात किंवा राज्याबाहेर प्रवासाच्या अंतराची मर्यादा असणार नाही. मात्र, शासन सेवेत दाखल झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत कर्मचाऱ्यांचे स्वग्राम घोषित करणे बंधनकारक आहे. या कालमर्यादेत स्वग्राम घोषित केल्यास त्या कर्मचाऱ्याला आपल्या सेवाकाळात एकदा स्वग्राम बदलण्याची संधी राहील. विहित कालमर्यादेनंतर स्वग्राम घोषित करण्यात आल्यास स्वग्राम घोषणा अंतिम राहील. महाराष्ट्र दर्शनाची सवलत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी चार वर्षांतून एकदा महाराष्ट्रात कोठेही जाण्यास ही सवलत अनुज्ञेय राहील. ही सवलत उपभोगताना किमान आणि कमाल अंतराच्या प्रवासाची अट राहणार नाही. २००१ मेपर्यंत दोन अपत्य असणाऱ्या कुटुंब असलेल्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (प्रतिनिधी)