करवाढ रद्द निर्णय; पालकमंत्री अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:58 AM2018-07-23T00:58:15+5:302018-07-23T00:58:37+5:30
नाशिक :महापालिका महासभेत स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या करवाढ रद्दचा निर्णयाबाबत हा पालकमंत्री गिरीश महाजन यांना अंधारात ठेवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे़ याबाबत पालकमंत्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या निर्णयाची कोणतीही माहिती नाही तसेच आपल्याशी चर्चा झाली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे़ शिवाय याविषयावर लवकरच सामंजस्याने तोडगा काढू, असेही सांगितले आहे़
नाशिक महानगरपालिकेने केलेली करवाढ ही अवास्तव असून, त्याबाबत आंदोलनेही करण्यात आली होती़ आयुक्तांनी ही करवाढ नागरिकांवर लादल्याची भावना व्यक्त केली जात होती़ लोकप्रतिनिधी व आयुक्त यांच्यामध्येही करवाढीवरून संघर्ष निर्माण झाला होता़ या संंघर्षातून यशस्वी मार्ग काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री महाजन यांच्याकडे सोपविली होती़ मात्र, जळगाव महापालिकेची निवडणूक असल्याने चार महिन्यांपासून ते नाशिकला आले नसल्याने स्थानिक भाजपा पदाधिकाºयांसमवेत बैठक झाली नाही़
त्याचदरम्यान आचारसंहिता कालावधीत करवाढ रद्दच्या निर्णयासाठी महासभा बोलविली मात्र त्यामध्ये निर्णयच झाला नाही़ विधान परिषद निवडणुका संपल्यानंतर विरोधी पक्षांच्या रेट्यास्तव भाजपाने तहकूब सभा १९ जुलैला पुन्हा बोलविली होती़ तत्पूर्वी म्हणजेच १४ जुलै रोजी पालकमंत्री महाजन हे नाशिकला आले होते़ त्यांनी शासकीय विश्रामगृहावर भाजपा पदाधिकाºयांसोबत बैठक घेऊन दोन्ही बाजू ऐकून घेतल्या व आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याशीही प्राथमिक स्तरावर बोलले, मात्र यावर फारशी चर्चा झाली नाही़ या बैठकीत करवाढ रद्दबरोबरच अंगणवाडी सेविका तसेच अन्य विषयांबाबत माहिती जाणून घेतली व या विषयांवर आठ दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते़ मात्र, सध्या नागपूरला विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने पालकमंत्री तेथील कामात व्यस्त झाल्याने महासभेच्या आत त्यांना बैठक घेऊन निर्णय घेणे शक्य झाले नाही़ याच दरम्यान, १९ जुलैला झालेल्या महासभेत भाजपा पदाधिकाºयांनी सरसकट करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला़
महासभेतील सरसकट करवाढ रद्दचा निर्णय हा उत्तर महाराष्ट संघटनमंत्री किशोर काळकर यांच्याशी चर्चा करून घेतल्याचे स्थानिक पदाधिकाºयांकडून सांगितले जाते आहे़ मात्र, या सर्व प्रकियेमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हे स्वत: सहभागी असताना त्यांना माहिती देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे़
महापालिकेच्या करवाढीनंतर सत्ताधारी भाजपावर चहूबाजूंनी टीका होत होती़ एकीकडे करवाढीवर आयुक्त ठाम होते, तर दुसरीकडे सत्ता असूनही भाजपा काही करीत नसल्याचा प्रचार करून विरोधकांनी हैराण केले होते़ यामुळे करवाढीबाबत काय निर्णय घ्यावा या पेचात असलेल्या भाजपाने परस्पर करवाढ रद्दचा निर्णय घेऊन शहरवासीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला़ मात्र पक्षस्तरावर आवश्यक ती काळजी न घेतल्याने पालकमंत्र्यांपर्यंत हा निर्णयच पोहोचला नाही़ मात्र पक्षस्तरावर ज्यांना याबाबत मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्यास सांगितले त्या पालकमंत्र्यांशी चर्चा न करताच हा निर्णय घेण्यात आला़
विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे मी नागपूरमध्ये व्यस्त होतो़ वास्तविक आयुक्त व लोकप्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकल्यानंतर दोघेही आपल्या मुद्द्यांवर ठाम होते़ त्यामुळे करवाढीसह विविध विषयांवर समन्वयाने तोडगा काढण्याबाबत बैठक घेणार होतो़ मात्र विधीमंडळातील कामकाजात व्यस्त असतानाच महापालिकेतील महासभेमध्ये हा निर्णय झाला व याबाबत आपल्याला माहिती नव्हती़ त्यामुळे या निर्णयाबाबत काय करायचे याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊ़ - गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक