महापौरांच्या जामिनावर आज निर्णय
By admin | Published: February 3, 2015 12:45 AM2015-02-03T00:45:09+5:302015-02-03T00:45:27+5:30
माळवी अद्याप रुग्णालयातच : अटक लांबविण्याच्या हालचाली !
कोल्हापूर : लाचप्रकरणी जाळ््यात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी अद्याप रुग्णालयातच आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज, मंगळवारी निर्णय होणार आहे. दरम्यान, कोल्हापूरची तसेच पदाची बदनामी टाळण्यासाठी राजीनामा मंजूर झाल्यानंतरच त्यांना अटक केली जावी, यासाठी जोरदार हालचाली सुरुआहेत. असे असले तरी जामीन अर्जावर काय निर्णय होतो, यावर त्यांची अटक अवलंबून आहे. महापौर म्हणून ‘लाचलुचपत’च्या जाळ््यात सापडणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महापौर आहेत. या प्रकरणाने त्यांची स्वत:ची, महापौर म्हणून त्या पदाची, राष्ट्रवादीची व कोल्हापूरच्या म्हणून या शहराची बेअब्रू झाली. महापालिकेतील ढपला संस्कृतीबद्दल आजपर्यंत अनेकवेळा उघड चर्चा झाली. परंतु, थेट महापौरच लाच प्रकरणात सापडल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तबच झाले. आता सगळ््यांचीच अब्रू गेली आहे. परंतु यापुढे किमान त्या या पदावर असताना तरी त्यांना अटक होऊ नये, असे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पातळीवर सुरू आहेत. पक्षाने राजीनामा घेतला तरी जोपर्यंत महापालिका सभेत त्यांचा रितसर राजीनामा मंजूर होत नाही, तोपर्यंत तांत्रिकदृष्ट्या त्याच महापौर असतील.महापालिकेने संपादित करून न वापर केलेली जागा परत द्यावी, यासाठी १६ हजारांची लाच घेताना माळवी यांना ३० जानेवारीला सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. राष्ट्रवादी काँग्रेसने लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांचा रुग्णालयात जाऊन राजीनामा घेतला. उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे कारण दाखवून त्या रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा ९ फेब्रुवारीस होत आहे. त्यामुळे त्यास अजून आठवड्याचा अवधी आहे. महापालिकेची विशेष सभा बोलविताना किमान सात दिवसांची मुदत द्यावी लागते. कायद्यानेच ते बंधनकारक आहे. त्यामुळे तो कालावधी कमी करताच येत नाही. महापौरांचे आजारपणाचे कारणही तेवढे दिवस चालू शकणार नाही, अशी सद्यस्थिती आहे. त्यामुळे आज (मंगळवार)त्यांच्या जामीनावर निर्णय होताच त्यांना सकाळीच अटक होण्याची शक्यता जास्त ठळक झाली आहे.महापौरांचा राजीनामा घेतल्याने विशेष सभेला पीठासन अधिकारी कोण ही चर्चा सुरू झाली आहे. परंतु महापालिका कायद्यात त्यासंबंधीचीही तरतूद आहे. ‘चेअरमन आॅफ दि मिटींग’प्रमाणे मेअर आॅफ दि मिटींगची निवड करता येते. त्यासाठी दोघा सदस्यांनी ठराव दिल्यास एखाद्या ज्येष्ठ सदस्यास पीठासन म्हणून नियुक्त करून सभेचे कामकाज करता येते.
हकालपट्टीबाबत आज निर्णय : तटकरे
तृप्ती माळवी यांचा पक्षाने तातडीने राजीनामा घेतला तरी त्यांना पक्षातून निलंबित अथवा काढून टाकलेले नाही. त्यासंबंधीचा अहवाल शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला आहे. आज, मंगळवारी मुंबईत होणाऱ्या पक्ष नेत्यांच्या बैठकीत त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.