पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत ओबीसींना आरक्षण न देण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:12+5:302021-07-21T04:12:12+5:30
नाशिक- राज्यातील महाविकास आघाडीतील ओबीसींना डिसेंबर २०२२ पर्यंत आरक्षण द्यायचे नसून त्यामुळेच ते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते ...
नाशिक- राज्यातील महाविकास आघाडीतील ओबीसींना डिसेंबर २०२२ पर्यंत आरक्षण द्यायचे नसून त्यामुळेच ते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या विषयावर मौन बाळगून आहेत. ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी पवार यांच्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे प्रयत्न करीत असून, तेच झारीतील शुक्राचार्य आहेत असा आराेप माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे सरचिटणीस चंद्रकांत बावनकुळे यांनी केला आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या चंद्रकांत बावनकुळे यांनी मंगळवारी (दि.२०) भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षणावरून आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारने ओबीसी आयोग तयार केला. मात्र, या आयोगाचे कामकाजच सुरू केले नाही. या विषयात केंद्र शासनाचा कुठेही संबंध येत नाही, असे सांगून ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश काढून ओबीसींचे आरक्षण टिकविले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप त्यांनी केला.
इन्फो...
...तर छगन भुजबळ यांना भाजप मदत करील
ओबीसी आरक्षणावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, भाजपने ओबीसी नेतृत्वाला नेहमीच प्रोत्सहन दिले आहे. राज्यातच नव्हे, तर देशातही सर्वाधिक ओबीसी नेत्यांना प्रतिनिधित्व दिले आहे. महाविकास आघाडीत मात्र तसे नाही, ओबीसींबाबत मंत्री विजय वडेट्टीवार बोलतात. छगन भुजबळ मोर्चे काढतात; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ओबीसी आरक्षणावर बोलत नाहीत. भुजबळ यांनी ओबीसींसाठी पुढाकार घेतल्यास भाजप त्यांना मदत करील, असेही बावनकुळे म्हणाले.
यावेळी आ. देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो..
युवकांना भाजपशी जोडण्यासाठी ‘एक मतदान केंद्र, २५ तरुण’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी भाजयुमोच्या वतीने ‘युवा वॉरिअर्स’ तयार करण्यात येणार आहे आणि २५ लाख युवकांना पक्षाशी जोडण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत बावनकुळे व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली. राज्यातील युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी युवा शक्ती संघटित करण्यात येत असून, डिसेंबर २०२१ पर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.