पवार यांच्या जामिनावर गुरुवारी फैसला
By Admin | Published: November 3, 2015 10:30 PM2015-11-03T22:30:23+5:302015-11-03T22:30:47+5:30
लाच प्रकरण : दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण
नाशिक : लाच प्रकरणातून जामिनावर मुक्त झाल्यानंतर तक्रारदाराच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदार व पोलिसांवर दबाव टाकल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मालेगावचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी रामचंद्र पवार यांचा जामीन रद्द करण्यासाठी दाखल अर्जावर न्यायालयात गुरुवारी फैसला होणार आहे. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील, लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आपले म्हणणे न्यायालयात सादर केले असून, दोन्ही बाजूंचा युक्तिवादही पूर्ण झाला आहे. नवीन शर्तींच्या जमीन व्यवहारात जागा मालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची धमकी देऊन पवार यांनी मध्यस्थामार्फत ३५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा प्रकार घडला होता. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रामचंद्र पवार व त्याच्या जोडीदारास अटक केली असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशही दिले होते. त्यानंतर जामिनावर सुटल्यावर पवार यांनी तातडीने अपर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्यांच्याविरुद्ध लाचेची तक्रार करणाऱ्या जमीन मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तत्कालीन नांदगाव तहसीलदार तसेच पोलिसांना दिले होते. पवार हे दोन दिवस म्हणजेच ४८ तास पोलीस कोठडी भोगून बाहेर पडल्याने निलंबित झालेले असतानाही त्यांनी बेकायदेशीरपणे गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदारांवर दबाव टाकल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा यासाठी तक्रारदार अॅड. शिवाजी सानप यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद पूर्ण झाला असून, गुरुवारी न्यायालय निर्णय देणार आहे.