आयुक्तपदाचा निर्णय अद्याप लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 01:20 AM2018-11-27T01:20:11+5:302018-11-27T01:20:26+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची ज्या तडकाफडकी राज्य शासनाने बदली केली, त्या तुलनेत त्यांच्या जागी नियुक्तीबाबत मात्र तत्परता दाखवली नाही. यामुळे आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते यावर दिवसभर शहरात चर्चा सुरू होत्या.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची ज्या तडकाफडकी राज्य शासनाने बदली केली, त्या तुलनेत त्यांच्या जागी नियुक्तीबाबत मात्र तत्परता दाखवली नाही. यामुळे आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते यावर दिवसभर शहरात चर्चा सुरू होत्या. त्यात अश्विनी जोशी यांच्यापासून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची नावे घेतली जात होती. दरम्यान, मुंढे समर्थक नागरी संघटनांनी येत्या गुरुवारी (दि.२९) शक्तिप्रदर्शन करणार आहेत. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची शासनाने गेल्या गुरुवारी (दि.२२) बदली केली. त्यांना शासनाच्या नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यभार सोपवण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी सोपवले मात्र महापालिका आयुक्तपदी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. सुरुवातील नाशिकचे जावई असलेल्या राधाकृष्ण गमे यांचे नाव निश्चित केले जात होते मात्र त्यांनाही अद्याप नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे नावात बदल तर होऊ शकतोच, परंतु नाशिकमध्ये अडीच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणाºया जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या नियुक्तीची शक्यता वर्तवली गेली.
मुंढे रुजू झालेच नाहीत
तुकाराम मुंढे यांची नियोजन विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यांच्याशी औपचारिक चर्चा करण्यात आली नाही किंबहुना दुय्यम जागेवर नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी सोमवारी (दि.२६) देखील मुंबईत रुजू होण्याचे टाळल्याचे वृत्त आहे. त्यांची अन्यत्र नियुक्ती होण्याचीदेखील शक्यता आहे.