कायदेशीर अभ्यासानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात निर्णय: गिरीश महाजन
By संकेत शुक्ला | Updated: February 22, 2025 20:50 IST2025-02-22T20:49:57+5:302025-02-22T20:50:36+5:30
पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल असाही व्यक्त केला विश्वास

कायदेशीर अभ्यासानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात निर्णय: गिरीश महाजन
संकेत शुक्ल, नाशिक: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात वरिष्ठ नेते कायदेशीर अभ्यास करून निर्णय घेतील. मुख्यमंत्री स्वत: कायदेतज्ज्ञ आहेत. हा प्रश्न तांत्रिक बाबीत अडकला असून, याबाबत ते योग्य तो निर्णय घेतील असे स्पष्टिकरण देतानाच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची भेट झाली असून येत्या दोन दिवसांत पालकमंत्री पदाचा तिढाही सुटेल, असा विश्वास जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला हप्ता लाभार्थ्यांना देण्यासाठी शनिवारी (दि. २२) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांची संवाद साधताना ते बोलत होते. प्रारंभी जुन्या नाशकातील अतिक्रमणीत बांधकाम काढण्यात आले असून, स्थानिक लोकांच्या मागणीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सुरू असलेले प्रकरण कायदेशीर बाब आहे. कोणी मागीतला म्हरून राजीनामा घेता येत नाही. नियमाला अधीन राहून वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील, असेही महाजन म्हणाले.
सिंहस्थासाठी कमी कालावधी राहिला आहे. पालकमंत्री नियुक्त करण्यासही उशीर झाला आहे. गृहमंत्री अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी त्यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झालीच असेल. येत्या दोन दिवसांतच हा तिढादेखील सुटेल, असा आशावाद व्यक्त करताना त्यांनी पालकमंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा देवाच्या मनात असेल तसे होईल, असे सांगितले.
भुजबळ मोठे नेते...
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. भाजपच्या नेत्यांची मात्र ते भेट घेतात, असे विचारले असता भुजबळ मोठे नेते अहेत. त्यामुळे ते कोणाच्या भेटीला कधीही जाऊ शकतात, असेही महाजन म्हणाले.