साठ व्हेंटिलेटर्स परत पाठवण्याचा निर्णय अखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:35+5:302021-06-18T04:11:35+5:30
महापालिकेला २० एप्रिल रोजी नोएडा स्थित एका कंपनीकडून पीएम केअर फंडाअंतर्गत ६० व्हेंटिलेटर्स पाठवले होते. मात्र, त्यासाठी लागणारे सेन्सर्स ...
महापालिकेला २० एप्रिल रोजी नोएडा स्थित एका कंपनीकडून पीएम केअर फंडाअंतर्गत ६० व्हेंटिलेटर्स पाठवले होते. मात्र, त्यासाठी लागणारे सेन्सर्स आणि स्टँडसह अन्य पूरक साहित्य न पाठवल्याने व्हेंटिलेटर्स असूनही त्याचा वापर करता येत नव्हता. यासंदर्भात कंपनीशी संपर्क साधला असता, कंपनीने स्टँडसह अन्य पूरक साहित्य पुरवण्याची जबाबदारी आपली नसून महापालिकेनेच ते खरेदी करावेत असे कळवले होते. त्यामुळे महापालिकेच्या कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलेाड यांनी कंपनीकडे केंद्र शासनाने दिलेली वर्क ऑर्डरदेखील मागविली होती. तसेच पाठपुरावा केल्यानंतर कंपनीचे तांत्रिक आधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये येऊन झाकीर हुसेन रुग्णालय तसेच बिटकेा रुग्णालयात व्हेंटिलेटर्स संदर्भातील सॉफ्टवेअर अपडेट करून ते कार्यान्वित केले. तसे दाखवल्यानंतरदेखील महापालिकेत पूरक साहित्य खरेदीअभावी ते पडून होते. त्यामुळे महापालिकेने पाठपुरावा केला. या व्हेंटिलेटर्समध्ये बॅटऱ्या नसल्याने त्या कंपनीच्या अधिकाऱ्याने पुण्यात जाऊन परत आणून दिल्या.
दरम्यान, हे सॉफ्टवेअर वापरण्यायोग्य नसेल तर परत पाठवण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. मात्र, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने वस्तुस्थिती स्पष्ट केल्यानंतर आता व्हेंटिलेटर्स परत पाठवण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याने सांगण्यात आले.
इन्फो...
सांगितले बालकांचे पाठवले प्रौढांचे व्हेंटिलेटर्स
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालकांना उपयुक्त ठरू शकतील, असे पाच व्हेंटिलेटर्स याच कंपनीने महापालिकेेला पाठवले. मात्र, बालकांऐवजी प्राैढांना वापरता येतील असेच व्हेंटिलेटर्स असल्याचे आढळल्याने महापालिकेने हे व्हेंटिलेटर्स परत पाठवले. परंतु पुन्हा हेच व्हेंटिलेटर्स पाठवण्यात आले त्यामुळे महापालिकेने ते पुन्हा परत पाठवले होते.